मुंबई - सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनचा फटका विविध घटकांना बसत आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना स्थिती आणि लॉकडाऊनची सध्यस्थितीबद्दल 'ई टीव्ही भारत'ने घेतलेला आढावा...
- प्रश्न - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सध्यस्थिती काय आहे? येत्या काळात या योजनेसंदर्भातला आराखडा कसा असेल?
उत्तर - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र या योजनेंतर्गत राज्यामध्ये सन २०२१-२२ या वर्षात आतापर्यंत एकूण ४.१९ लाख कुटुंबातील ७.०९ लाख मजुरांना मजुरी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर २०२०-२१ या वर्षात १६.८४ लाख कुटुंबातील ३१.११ मजुरांना मजुरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अजूनही राज्यातल्या अनेक भागात रोजगार हमीची कामे सुरू आहेत.
योजनेंतर्गत सन २०२१-२२ या वर्षात राज्यात आतापर्यंत एकूण १८०.१५ कोटी इतका खर्च झालेला असून, यामध्ये १६१.३३ कोटी इतका अकुशल मजूरीवरील खर्चाचा समावेश आहे. तर २०२०-२१ मध्ये एकूण २०१९.८७ कोटी इतका खर्च झालेला आहे. योजनेंतर्गत २०२१-२२ या वर्षामध्ये राज्यात एकूण १०,८६४ इतकी विविध प्रकारची कामे पूर्ण करण्यात आली असून ६,३७,९८९ इतकी कामे प्रगतीपथावर आहेत, तसेच सन २०२०-२१ या वर्षात एकूण २,५२,०५२ इतकी कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
- प्रश्न - असंघटित क्षेत्रात रोजगाराची स्थिती काय आहे? लॉकडाऊन झालेल्या राज्यांमधील बाजार व व्यवसाय बंद पडल्याने किती लोक बेरोजगार होतील?
उत्तर - राज्यातील १३ लाखांपैकी ११ लाख १० हजार नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य, १६६ कोटी ६३ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा निधी बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा झालेला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत सक्रीय १३ लाख बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट (डीबीटी) जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार राज्यातील १३ लाखांपैकी आजपर्यंत ११ लाख १० हजार ९२९ नोंदीत बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या ३० एप्रिलअखेर १६६ कोटी ६३ लाख ९३ हजार ५०० रुपयांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा होणार.
घरेलू कामगार माहिती-
महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण केलेल्या एक लाख ५ हजार ५०० घरेलू कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य, १५ कोटी ८२ लाख ५० हजार रुपयांच्या निधी वितरणास मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरण झालेल्या घरेलू कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात सक्रिय व जीवित नोंदणी असलेल्या एकूण एक लाख ५ हजार ५०० घरेलू कामगारांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे एकूण १५ कोटी ८२ लाख ५० हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. निर्णयानुसार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी व नुतनीकरण झालेल्या एक लाख ५ हजार ५०० घरेलू कामगारांच्या बँक खात्यामध्ये थेट (डीबीटी) द्वारे प्रत्येकी दीड हजार रुपये वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे.
- प्रश्न - राज्यामधील सर्व मोठे औद्योगिक क्षेत्र सध्या चालू आहेत का? नसल्यास तेथील कामगारांची स्थिती काय?
उत्तर - राज्यात सध्या २३.५ हजार उद्योगात ११.४ लाख कर्मचारी कामावर आहेत. सद्यपरिस्थितीत राज्यातील ९० टक्के उद्योग पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. एमआयडीसीत कोरोना चाचण्या आणि लसीकरण केंद्र उभारल्याने कामगारांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण होवून कंपन्यांमध्ये काम सुरु आहे.
सध्या ११.४ लाख कर्मचारी कामावर
यंदा राज्याने तीन श्रेणीतील उद्योगांना काम सुरू ठेवण्यास परवानगी दिली. राज्यात अत्यावश्यक सेवेतील १० हजार उद्योग सुरू असून यात ४,६८,५२५ मणुष्यबळ कामाला आहे. निर्यातावर आधारीत १४७१ उद्योगांमध्ये २,०४,९२२ कर्मचारी काम करत आहेत. तर उत्पादन बंद न करता येण्याच्या श्रेणीतील ८९८ युनिट सुरू असून येथे ९८,६७६ कर्मचारी काम करत आहेत. या व्यतिरिक्त ११,१५६ उद्योगांनी ३,६८,८९० कर्मचाऱ्यांची त्यांच्या कंपन्यातच निवासाची सोय केली आहे. अशा प्रकारे सर्व मिळून २३,५२५ उद्योगात आजघडीला ११,४१,०१३ कर्मचारी काम करत आहे. नियमीत कर्मचाऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण ७० टक्क्याहून अधिक आहे.
- प्रश्न - पर्यटन क्षेत्राशी निगडीत असलेल्या नागरिकांची काय स्थिती?
उत्तर - महाराष्ट्रात सध्या टाळेबंदी असल्याने पर्यटन हा व्यवसाय ठप्प झालेला आहे. महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्र GDP 8.5 टक्के आहेत. महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रातील GDP नुसार वार्षिक उत्पन्न 5500 कोटी रुपये आहेत. या क्षेत्राशी निगडित राज्यात 2 लाख ८० हजार नागरिकांना रोजगार मिळतोय. मात्र कोरोनाच्या टाळेबंदीमुळे हा रोजगार बुडालेला आहे.
- प्रश्न - शाळा-महाविद्यालय-विद्यापीठाशी संबंधित कर्मचार्यांची काय स्थिती?
उत्तर - राज्यातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या सध्याच्या एकूण शाळांचा विचार केल्यास ही संख्या एक लाख ९ हजार ९८९ पर्यंत जाते. शिक्षकांची संख्या साडेसात लाखांपर्यत आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यत साधारण दोन कोटी २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या कोरोनामुळे शासकीय सेवेत असलेल्या शिक्षकांना वेतन मिळत आहे. मात्र, यापैकी कायम विना अनुदानित आणि विना अनुदानित शाळात तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये जवळ- जवळ २ लाख ५० हजार शिक्षक आहे. यापैकी ७० टक्के शाळा कोरोनामुळे वेतन देत नाही. उर्वरित ३० टक्के शिक्षकांना वेतन कपात करून मिळत आहे. राज्यातील शालेय मुलांना घेऊन जाणाऱ्या बसची चाके मागील एका वर्षापासून थांबली आहे. राज्यात ७० हजार स्कुल व्हॅन तर ४० हजार स्कुल बसेस बंद असल्याने सर्वांचा रोजगार बुडाला आहे. जवळजवळ साडे चार लाख नागरिक स्कुल बसच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. राज्यात जवळपास ७०० महाविद्यालय आहेत. यात २० हजार पार्ट टाईम प्राध्यापक म्हणून काम करतात. मात्र, कोरोनामुळे या प्राध्यापकांना लेक्चर मिळत नसल्याने आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
- प्रश्न - लॉकडाऊनमुळे रेल्वेच्या निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबांची काय परिस्थिती?
उत्तर - भारतीय रेल्वेत एकूण 13 लाख कर्मचारी आहेत. त्यापैकी मध्य रेल्वेवर 1 लाख 3 हजार रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या आहेत. तसेच कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांची संख्या 5 लाखांच्या घरात आहे. ज्यामध्ये ट्रॅक मेंटेनेंस, स्वच्छता कर्मचाऱ्यांनाच समावेश आहे. विशेष म्हणजे रेल्वे परिसरात रेल्वे परिसरात स्टॉलधारक, बूट पॉलिश करणाऱ्यांची संख्य ३० हजार तर लाल वर्दीतील रेल्वे हमालांची संख्या २० हजाराचा घरात आहे. मात्र, गेल्या एका वर्षांपासून रेल्वे परिसरात स्टॉलधारक, बूट पॉलिश आणि हमालांना सर्वाधिक झड पोहचली आहे.