मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील तीन महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे कामधंदे, व्यवसाय, सर्वकाही ठप्प आहे. काही व्यावसाय, कार्यालयातील मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पगार दिला. मात्र, हातावर पोट असणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलांना तीन महिने कोणेतेही वेतन मिळाले नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.
घरकामगार कायदा अस्तित्त्वात असताना देखील या महिला कामगारांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत आतापर्यंत मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे दिसत आहे. मात्र, सरकारने त्यांना आतातरी मदत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या आणि घरकाम करणाऱ्या महिला करत आहेत.
हेही वाचा... लॉकडाऊन काळात घरात बसून २४ वर्षीय प्रियाने कमावले १ लाख रुपये, जाणून घ्या कसे
घरेलू कामगार संघटना व सामाजिक संस्था, घर काम करणाऱ्या महिला कामगारांच्या प्रश्नांवर सरकारचे वारंवार लक्ष वेधण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकारला जाग येत नाही महिलांना जगावे की मरावे ,असा प्रश्न पडला आहे. राज्य सरकारने २००८ मध्ये घर कामगारांच्या कल्याणासाठी विधिमंडळात विधेयक मंजूर केले. ‘महाराष्ट्र घरगुती कामगार कल्याण मंडळ अधिनियम-२००८’ असे या कायद्याचे नाव असून राज्यपालांच्या मंजुरीनंतर तो २००९ पासून अस्तित्वात आला. मात्र, त्याची अंमलबजावणी सरकारकडून होताना दिसत नाही. त्यामुळे मागूल अनेक वर्षांपासून घरेलू कामगारांना आपल्या हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे.
काही घर मालकांनी मागील कालावधीत काही घरेलू कामगार महिलांना तीन महिन्याचा पगार दिले. परंतु, 98 टक्के महिलांना लॉकडाऊन काळात पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच पुढील काळात म्हणजे अनलॉक सुरू झाल्यापासून देखील घरेलू कामगार महिलांना अजूनही कामावर घेण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना पुढे रोजगार मिळेल की, नाही याची देखील चिंता लागलेली आहे. त्यामुळे घरेलू कामगार कायद्यात तरतूद असताना देखील राज्य सरकारने अजूनही घरेलू कामगार महिलांना मदत केलेली नाही.
साधारण साडेचार लाख घरेलू कामगार महिला या अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करत आहेत. कदाचीत त्या येत्या काही दिवसात आपला रोष व्यक्तही करतील. त्यामुळे सरकारने तातडीने लक्ष देऊन महिला कामगारांना मदत करावी, असे सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विलास यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... दुर्दैवी..! पोहण्यासाठी गेलेल्या चार परप्रांतीय सख्ख्या भावंडांना जलसमाधी
काही घरेलू कामगार महिलांचे पती हे कोणत्यातरी कार्यालयात किंवा रोजंदारीवर काम करून पोट भरत असतात. त्यात या महिला हातभार लावून घर चालवतात. परंतु आता त्यांच्याकडे रोजगार नसल्याने त्यांच्यावर भूकमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे सरकारने काही महिन्यांपूर्वी घरेलू कामगार महिलांच्या निर्णयासाठी जी समिती गठन केली होती, त्या समितीत लवकर कामगार आयुक्तांनी एकत्र येत निर्णय घेऊन, घरेलू महिला कामगारांना मदत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विलास यांनी केली आहे.
तसेच महिला घरेलू कामगारांना पुढील अजून काही महिने मालक कामावर बोलावणार नाही. त्यामुळे आम्ही जगायचं कसं ? सरकारने आमच्या मालकांना कामावर घेण्यासाठी आदेश द्यावेत आणि योग्य ती खबरदारी घेत उपायोजना करत घरेलू महिला कामगारांना कामावर घेण्यासाठी परवानगी द्यावी. आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी घरेलू कामगार महिला सुरेखा जगताप यांनी सरकारकडे केली आहे.