मुंबई - रस्त्यावर धावणाऱ्या लाखो गाड्या आणि कारखान्यांच्या धुरामुळे प्रदूषित झालेल्या मुंबई परिसरातील भागात आता हवेची स्थीती समाधान कारक झाल्याने, प्रदूषण घटल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरासह महाराष्ट्र ही लॉकडाऊन झाल्याने एक चांगली गोष्ट घडली आहे. ती म्हणजे कधी नव्हे ती मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील प्रदूषणात घट झाली आहे. हवेची गुणवत्ता सुधारली आहे. एमएमआरची सरासरी हवेची गुणवत्ता समाधानकारक अर्थात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 100 वर आला आहे. पुढच्या 20 दिवसात हा निर्देशांक 50 वर येऊन उत्तम होईल असा विश्वास पर्यावरण तज्ञ डॉ संजय जोशी यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई, कधी न थांबणारे शहर, वेगवान शहर अशी मुंबईची ओळख. मुंबईत दररोज हजारोच्या संख्येने गाड्या धावतात. अनेक बांधकाम प्रकल्पाचे, पायाभूत सुविधांचे काम सुरू आहे. रस्त्यावरही मोठी गर्दी असते. त्यामुळे मुंबईतील हवा अत्यंत प्रदूषित झाली आहे. मुंबई आणि एमएमआरसाठी प्रदूषण ही मोठी समस्या बनली आहे. असे असताना गेल्या तीन दिवसांत मात्र मुंबई सह एमएमआरची हवेची गुणवत्ता सुधारली असून प्रदूषण कमी झाले आहे.
पर्यावरण तज्ञ डॉ संजय जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार एमएमआरचा अर्थात नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि मुंबई येथील सरासरी हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 100 वर आला आहे. म्हणजेच सद्या हवेची गुणवत्ता समाधानकारक आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 0-50 पर्यंत उत्तम, 50-100 समाधानकारक, 100-150 पर्यंत ठीक तर 150-200 अतिधोकादायक मानला जातो.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता ही नेहमीच अतिधोकादायक पातळीवर असते. मात्र, गेल्या 3 दिवसांत मात्र ही पातळी समाधानकारक झाली आहे. कारण लॉकडाऊनच्या पाश्र्वभूमीवर गेली 3 दिवस वाहने खूप कमी झाली आहेत. वर्दळ कमी झाली असून सर्व प्रकारची कामे बंद आहेत. परिणामी हवेची गुणवत्ता सुधारली आहे. आजच्या घडीला ऐरोलीतील हवेची गुणवत्ता सर्वात उत्तम आहे. कारण येथील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 38 वर आला आहे. ठाणे आणि मुलुंडचा निर्देशांक 55 वर आला आहे. म्हणजेच येथील प्रदूषणही खूप कमी झाले आहे अशी माहिती पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी दिली आहे. मुंबई, डोंबिवली, कल्याण अशा ठिकाणी तो 100 ते 150 च्या दरम्यान आहे. पुढचे 20 दिवस देश लॉकडाऊन रहाणार असल्याने ही गुणवत्ता आणखी सुधारेल असा विश्वास डॉ संजय जोशी यांनी व्यक्त केला आहे.