मुंबई - कोरानाचा प्रादुर्भाव वाढल्याने 19 मार्चपासून शहरातील डबे पोहचवण्याचा व्यवसाय बंद करण्यात आला. अनलॉक दरम्यानही यावरील बंदी कायम होती. मागील साडेपाच महिन्यांपासून डबेवाल्यांना रोजगार नाही. त्यामुळे डबेवाल्यांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. मुंबईतील 'लोकलसेवा सुरू करा, अन्यथा डबेवाल्यांना महिना किमान ३ हजार रुपये अनुदान द्या', अशी मागणी मुंबई डब्बेवाला असोसिएशनने केली होती. त्यात कालच कॅबिनेटच्या बैठकीत मुंबईच्या डबेवाल्यांना रेल्वे प्रवासाला परवानगी देण्यात आल्याने डबेवाले आनंदित झाले आहेत.
मुंबईतील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. शासकीय, निमशासकीय, तसेच कार्पोरेट कार्यालये सुरू होत आहेत. या कार्यालयात चाकरमानी अंशता का होईना कामावर रूजू होऊ लागला आहे. हे चाकरमानी आपल्या डबेवाल्याला फोन करून डबे पोहचते करायला सांगत होते. मात्र, लोकलसेवा सुरू नसल्याने डबेवाल्यांना अडचणी येत होत्या. यासाठी मुंबई डबेवाला असोसिएशन गेल्या महिनाभरापासून ट्रेनमध्ये प्रवासाची परवानगी देण्याची मागणी करत होते. यानंतर पुन्हा डबेवाल्यांना लोकल सेवा देण्याची मागणी जोर धरू लागली.
यावर काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनलॉक नियमावली जाहीर करण्यात आली. त्यात डबेवाल्यांना रेल्वेप्रवासास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे डबेवाल्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. व्यवसाय सुरळीत चालू होणार असल्याने डबेवाल्यांची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.
यामुळे डबेवाला संघटनेचे विष्णू काळोखे यांनी सरकारचे आाभार मानले आहेत.