मुंबई - मद्यविक्रीबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लॉकडाऊनमधून सूट देण्यात आलेल्या यादीत मद्यविक्री दुकानांचा समावेश करण्याची मागणी अनेकजण करत आहेत. याबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करून अंतिम निर्णय जाहीर केला जाईल,असे ट्वीट टोपे यांनी केले आहे. याआधी त्यांनी फेसबूकवर संवाद साधताना दारूची दुकानं सुरू करण्याचे संकेत दिले होते.
सोमवारी (20 एप्रिल) काही ठिकाणी अटींवर उद्योग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. कोरोनामुळे राज्य सरकार सध्या आर्थिक अडचणीत आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करून राज्याचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच अन्य उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. उत्पादन शुल्काच्या माध्यमातून राज्य सरकारला मिळणारा उत्पन्नाचा आकडा देखील मोठा आहे. त्यामुळे मर्यादित स्वरूपात सोशल डिस्टन्सींगचे तत्व पाळून मद्यविक्री सुरू करता येईल का, याची पडताळणी राज्य सरकारकडून सुरू आहे.
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे आरोग्य आणि पोलीस यंत्रणेवरील ताण वाढलाय. त्यामुळे राज्य सरकारकडे हा प्रस्ताव विचाराधीन आहे. 'सोशल डिस्टन्सिंच्या नियमांचं योग्य पालन केल्यास दारूच्या दुकानांवर कोणतीही बंदी असणार नाही', असे टोपे म्हणाले. मात्र, त्यांनी दारुची दुकाने कधी सुरू होतील, याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नव्हती. यानंतर त्यांनी ट्विट करत मद्यविक्री दुकानांबाबात काटेकोरपणे नियमावली तयार करूनच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.