मुंबई - मुंबईमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला वेग आणण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये इर्मजन्सी वापरासाठी लसीकरणासाठी काही कंपन्यांनी आयसीएमआरला परवानगीसाठी पत्र दिले आहे. ही परवानगी मिळाल्यास लहान मुलांच्या लसीकरणाचाही मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
लहान मुलांच्या लसीकरणाची ट्रायल -
मुंबईत सध्या पालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालये अशा ३९० ठिकाणी लसीकरण सुरू आहे. लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यास या केंद्रावर दिवसाला दीड लाखांवर लसीकरण करण्याची पालिकेची क्षमता आहे. दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे. त्यामुळे पालिकेने लसीकरणावर भर दिला आहे. तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. ही लाट आल्यास लहान मुलांना जास्त धोका असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पालिकेने लहान मुलांसाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध केली आहे. तसेच लहान मुलांचे लसीकरण ट्रायल घेण्यासाठी पालिकेने आपली यंत्रणाही सज्ज ठेवली असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत सध्या ३९० केंद्रावर लसीकरण सुरू आहे. लस साठा पुरेसा उपलब्ध झाल्यास रोज दीड लाख लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य पालिकेचे आहे. २६ जून रोजी एकाच दिवसांत मुंबईत १ लाख ५४ हजार २२८ इतके डोस देण्यात आले होते. त्यामुळे येत्या काळात लसीकरणावर भर दिला जाणार आहे. मुंबईत आतापर्यंत ५० लाखांवर लसीकरण झाले असून १० लाखांहून अधिक लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. सध्या एक ते दीड लाखांपर्यंत लसीकरण केले जात आहे. हे दोन लाखांपर्यंत वाढवले जाईल तसेच लहान मुलांनाही लस दिली जाईल.