मुंबई - सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडी सरकारचीही चौकशी करावी, असा रेटा विरोधकांनी लावून धरला आहे. मात्र कोणत्याही यंत्रणांनी चौकशी करा. आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत, असे स्पष्टीकरण शिवसेना नेते अनिल परब यांनी दिले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवास्थानाजवळ स्फोटके ठेवलेली कार आढळून आली होती. यामध्ये कारमालकाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
चौकशीला तयार-
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाझे यांच्यावर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली होती. मात्र सत्ताधाऱ्यांनी वाझे यांचे त्यावेळी जोरदार समर्थन केले होते. एनआयएने वाझे यांना आता अटक केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारची कोंडी झाली आहे. त्यामुळे विरोधीपक्षांनी वाझे यांची पाठराखण करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची चौकशी करावी, अशी मागणी लावून धरली आहे.
शिवसेनेचे नेते आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांना याबाबत विचारले असता, आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. कोणत्याही यंत्रणांनी चौकशी करा, असे परब म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी दबाव टाकल्याचा आरोप-
सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दबाव टाकल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र हे आरोप परब यांनी खोडून काढताना, या सगळ्या कल्पना आहेत. अर्टनी जर्नल यांनी कोणते ओपिनियन रायटिंगमध्ये मागितले होत, आणि कोणते दिले, हे फडणवीस यांनी सगळ्यांसमोर मांडावे, असे आव्हान परब यांनी दिले आहे. त्यामुळे फडणवीस याबाबत काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हेही वाचा- सचिन वाझे प्रकरणावरून सत्ताधारी-विरोधकांध्ये जुंपली