मुंबई - २०२२ या वर्षात विधान परिषदेतील १७ आमदार निवृत्त होत आहेत. यापैकी निवृत्त होणारे १० आमदार हे विधानसभा सदस्यांमधून निवडून आलेले आहेत, तर उर्वरित ७ हे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आहेत. (Legislative Council Election 2022) या आमदारांमध्ये विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर तसेच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचाही समावेश आहे. नवीन वर्षात होणाऱ्या या निवडणुकीमुळे विधान परिषदेतील राजकीय चित्र पूर्णपणे बदलणार आहे.
विधानसभेतून जाणाऱ्या १० व्या जागेसाठी रंगणार चुरस -
पुढील वर्षी होणाऱ्या १७ आमदारांच्या निवडणुकीसाठी आत्तापासूनच रंगीत तालीम सुरू झाली आहे. (Legislative Council Election 2022) विधानसभा सदस्यांमधून निवडून येणाऱ्या १० जागांसाठी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या २७ मतांची आवश्यकता असेल. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे ४, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी २ तर काँग्रेसचा १ सदस्य निवडून येऊ शकतो. परंतु दहाव्या जागेसाठी चुरस असेल. काँग्रेसकडील अतिरिक्त मते आणि अपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडीकडून पुरस्कृत करण्यात येणारा उमेदवार निवडून येऊ शकतो. महाविकास आघाडी ६ तर भाजपचे ४ उमेदवार निवडून येतील, असे सध्यातरी गणित आहे. याउलट स्थानिक प्राधिकारी संस्थेच्या ७ मतदारसंघातील निवडणुकीत चुरस असेल. विधान परिषद आमदारकीसाठी अधिक लक्ष्मीदर्शन करणाऱ्याला संधी असते. पुढील वर्षी ठाणे, पुणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, भंडारा – गोंदिया व यवतमाळ मतदारसंघांतील आमदारांची मुदत संपुष्टात येत आहे. याबरोबरच नगर आणि सोलापूर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातील लांबणीवर पडलेली निवडणूकही पुढील वर्षात होणार आहे.
हे ही वाचा -उताराला लागलेल्या काँग्रेसला राहुल गांधी सावरणार!, वाचा राऊतांनी केलेली 'रोखठोक' चर्चा
निंबाळकर, देसाई या ज्येष्ठांना संधीची शक्यता कमी -
यामध्ये सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पुन्हा संधी दिली जाते का, याची उत्सुकता असेल. उभयतांचे वय झाले असले तरी अनुभव तसेच उपयोगिता लक्षात घेऊनच राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेतृत्व निर्णय घेईल. मंत्री सुभाष देसाई हे जरी वयाने मोठे असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे व विश्वासातले असल्या कारणाने त्यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा -Sanjay Raut On Gopinath Munde : शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळलं होतं : संजय राऊत
भाजपपुढे आव्हान -
निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये सर्वाधिक ८ आमदार हे भाजपचे आहेत. शिवसेना ४, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ तर काँग्रेसचे २ आमदार निवृत्त होत आहेत. संख्याबळ कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान असेल. विधानसभेतून भाजपचे ४ उमेदवार निवडून येऊ शकतात. स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातील चित्र कागदावरील संख्याबळावरून ठरत नाही तर कोणता उमेदवार अधिक प्रभावी आहे हे महत्त्वाचे असते. विधान परिषदेतील राज्यपालनियुक्त १२ जागा अजूनही रिक्त आहेत. त्यातच १७ सदस्य नव्या वर्षात निवृत्त होत असल्याने राजकीय चित्र बदलणारे आहे हे नक्की.
निवृत्त होणारे सदस्य -
भाजप -
प्रवीण दरेकर (विरोधी पक्षनेते), सदाभाऊ खोत, सुजिर्तंसह ठाकूर , विनायक मेटे, प्रसाद लाड, रामनिवास सिंह, चंदुभाई पटेल, परिणय फुके.
शिवसेना -
उद्योगमंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रवींद्र फाटक, दुष्यंत चतुर्वेदी.
राष्ट्रवादी काँग्रेस -
संजय दौंड, सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अनिल भोसले
काँग्रेस -
मोहन कदम , अमर राजूरकर.