मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नव्या वाहन चालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता वाहन चालवण्यासाठी आवश्यक लर्निंग लायसन्ससाठी आरटीओच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. कारण वाहन चालकांसाठी घरबसल्या लर्निंग लायसन्स काढण्याची सुविधा मे महिन्यापासून सुरू करत असल्याची माहिती राज्य परिवहन विभागाने दिली आहे. याबाबतची चाचणी अंतिम टप्प्यात असून एप्रिल अखेरपर्यंत चाचणी पूर्ण होताच सेवेचा शुभारंभ करणार असल्याची माहिती आहे.
ऑनलाईन लर्निंग लायसन्स चाचणी
गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भावामुळे देशभरातील आरटीओ कार्यलयातील कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे महसूलसुद्धा मोठ्या प्रमाणात तूट निर्माण झालेली होती. त्यानंतर केंद्रीय परिवहन मंत्र्याने आरटीओचे कामकाज डिजिटल करण्याचे आवाहन देशातील राज्य परिवहन विभागांना करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ३ मार्चला यासंदर्भातील अधिसूचना जारी केली होती. त्यात आरटीओ कार्लालयांतील गर्दी कमी करण्यासाठी १८ प्रकारच्या सेवांना ऑनलाइन करण्याचे आदेश दिले होते. त्यात लर्निंग लायसन्स सेवेचा समावेश होता. घरात बसून लर्निंग लायसन्स काढताना कोणतीही समस्या येऊ नये, म्हणून या सेवेची चाचणी घेण्यात येत आहे. ही चाचणी अंतिम टप्प्यात असून येत्या १० दिवसांत त्यातील काही त्रुटी दूर होण्याची शक्यता आहे. परिणामी, १ मेच्या शुभ मुहूर्तावर सर्वसामान्यांसाठी घरबसल्या लर्निंग लायसन्स देण्याची सेवा राज्यातील ५० आरटीओ कार्यालयामध्ये सुरू करण्याचा मानस असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नव्या चालकांना मिळणार दिलासा
लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आणि त्याबाबतची कागदपत्र तपासणीसाठी आरटीओमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यात राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे परिवहन विभागाने आरटीओ कर्मचाऱ्यांना ५० टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन व्हावे, म्हणून परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनीही लर्निंग व ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आवश्यक ऑनलाइन अपॉईंटमेंटची संख्या २५ टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. म्हणूनच मुंबईसारख्या शहरांमध्ये लर्निंग लायसन्स काढण्यासाठी नव्या चालकांना २ ते ३ महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी, घरात बसून ऑनलाइन लर्निंग लायसन्स काढण्याची सेवा राज्यात सुरू झाल्यास प्रत्येकवेळी प्रतीक्षा कराव्या लागणाऱ्या नव्या चालकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.