मुंबई - कोविड रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्स आणि पारिचारिकांना सेवा न मिळणे चुकीचे असून त्यांना महापालिकेने सर्व सोयी-सुविधा पुरवायला हव्या, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. कोविड रुग्णसेवेसाठी आलेले केरळचे 40 डॉक्टर सुविधा मिळत नसल्याने पुन्हा त्यांच्या राज्यात निघून गेल्याचे दरेकर यांनी सांगितले. हे पालिकेचे अपयश असल्याचे ते म्हणाले.
शहरातील नाहूर येथे पीएपी इमारतीत डॉक्टर्स आणि पारिचारिकांच्या राहण्याची व्यवस्था मुंबई महापालिकेने केली आहे. या इमारतीत कोणत्याही सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याचा तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. मात्र, पालिका दुर्लक्ष करत असल्याने डॉक्टरांनी हा प्रश्न प्रविण दरेकर यांच्याकडे मांडला. त्यानंतर दरेकरांनी आज सकाळी या ठिकाणी भेट दिली; आणि डॉक्टरांकडून सविस्तर माहिती घेतली.
तसेच त्यांनी उपस्थित पालिका अधिका-यांना तातडीने सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये तत्काळ अॅक्वागार्ड आणि गरम पाण्यासह जेवणाची व्यवस्था करण्याचा विषय अंतर्भूत आहे. अन्य काही असुविधा असल्यास त्या देखील दूर करण्याचे आश्वासन पालिकेच्या अधिका-यांनी दिले.
प्रविण दरेकर यांनी आज सकाळी नाहूर रेल्वे स्थानकाजवळील पीएपी इमारतीची पाहणी केली. यावेळी खासदार मनोज कोटक, आमदार मिहिर कोटेजा, पालिकेतील अधिकारी किशोर गांधी, आदी उपस्थित होते.