मुंबई - उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर राहण्यासाठी सहा महिन्यांच्या आत विधीमंडळाचे सदस्य होणे आवश्यक आहे. हे सदस्यत्व मंजूर करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भूमिका महत्वपूर्ण आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा सत्ताधारी, विरोधक आणि राज्यपाल यांच्यातील बैठकींनी वातावरण तापल्याचे चित्र आहे.
विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांनी आज राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. राज्य सरकार पत्रकारांना दहशतीत ठेवत असून त्यांच्यावर पोलिसांच्या माध्यमाने दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केला.
या प्रकरणाची तक्रार घेऊन त्यांनी थेट राज्यपालांकडे धाव घेतलीय. दरम्यान, फडणवीस यांच्या शिष्ट मंडळाने पत्रकारांच्या मुद्यावर राज्यपालांना निवेदन दिले आहे. मात्र, खरी चर्चा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्यत्वाची झाल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे.
याव्यतिरिक्त सत्ताधारी गोटात देखील तणावाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासाठी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या सदस्य पदासाठी मंत्रिमंडळाने कोश्यारींना विनंती केली होती. आता या प्रकरणाला एक महिना उलटल्यानंतरही राज्यपालांनी कोणताही निर्णय न दिल्याने सत्ताधारी हवालदिल झाले आहेत. येत्या 27 मे पूर्वी मुख्यमंत्री ठाकरे विधीमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य न झाल्यास त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो. हा घटनात्मक पेच टाळण्यासाठी सत्ताधारी चिंतातुर आहेत. यासंदर्भात जुन्या महापौर बंगल्यावर मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान राज्यपालांच्या निवासस्थानी राजभवनात संध्याकाळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिपंकर दत्ता यांच्या शपथ विधीचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राज्यपाल कोशयारी यांची आमदारकीच्या पेचावर भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.