मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आणि सामाजिक कार्यकर्ते सतिष उके यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने मार्च महिन्यात अटक केली होती. सतीश उके यांनी गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टामध्ये ईडीविरोधात आरोपपत्रामध्ये फेरबदल केल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कोर्टासमोर केली. जमीन गैरव्यवहारात मनी लाँड्रींगप्रकरणी सतीश उके प्रकरणात हा मोठा गौप्यस्फोट आहे.
सतीश उकेंच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात 2 तक्रार अर्ज दाखल - ईडीकडून उके प्रकरणात दाखल चार्जशीटमध्ये फेरबदल केल्याचा आरोप सतीश उके याचे वकील अॅड. रवी जाधव यांनी केला आहे. या संदर्भात उकेंच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयात 2 तक्रार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या अर्जानंतर न्यायालयाने संबंधित चार्जशीट सुरक्षित कस्टडीमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. आता हे प्रकरण पुढे काय वळण घेते, याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ते सातत्याने आवाज उठवत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलणारे ते नागपुरातील पहिले वकील आहेत.
प्रकरण नागपूरला हस्तांतरित करण्याची विनंती - देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील सतीश उके यांच्या घरी 31 मार्च रोजी ईडीच्या पथकाने धाड घातली होती. जवळपास 6 ते 7 तासांच्या चौकशीनंतर सतीश उके व त्यांच्या भावाला अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात ईडीच्या विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. ईडी मुंबईद्वारे ईसीआयआरसह केल्या जात असलेल्या चौकशीतून मुक्तता मिळावी आणि हे प्रकरण नागपूरला हस्तांतरित करण्यात यावे, अशी विनंती उके बंधूंनी ईडीच्या विशेष न्यायालयाला केली होती.
ईडी मुंबईने नागपुरातून केली होती अटक - न्यायालयाने ती फेटाळून लावली होती. योग्य कायदेशीर मंचाकडे जाण्याची त्यांना मात्र मुभा दिली. या प्रकरणी विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या समक्ष सुनावणी झाली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपात अॅड. सतीश उके व त्यांचे बंधू प्रदीप उके यांना 31 मार्च 2022 रोजी ईडी मुंबईने नागपुरातून अटक केली होती. सतीश उकेंचे वकील रवी जाधव यांच्या आरोपानंतर हे प्रकरण काय वळण घेते. हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.