मुंबई - डोक्यावर छप्पर नसलेले बेघर नागरिक, भटके प्राणी यांना कोरोना होत नाही, त्याचे कारण त्यांच्यात सी आणि डी जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते. त्या तुलनेत माणसांमध्ये या जीवनसत्वांचे प्रमाण कमी असते. नागरिकांनी ही जीवनसत्वे वाढवावीत असे आवाहन करतानाच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी 'हसत रहा आणि हसवत रहा', हाच रामबाण उपाय आहे, असा सल्ला क्षयरोग तज्ज्ञ डॉ. ललित आनंदे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिला.
'मुंबईकराचे स्पिरीट दाखवू या'
कोरोनाचे रुग्ण मानसिक तणावात जगत आहेत. अनेकदा रात्री-अपरात्री रुग्णांना वाईट स्वप्न पडतात. माझे आणि माझ्या कुटुंबाचे काय होईल, या चिंतेने ते रात्र रात्र अस्वस्थ असतात. कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास समाजाकडून हीन वागणूक दिली जाते. परंतु, माणसाने माणसाची मदत करायला हवी. प्रत्येक क्षेत्रातील सोयायटी, गृहनिर्माण संस्थानी एकत्र येऊन कोरोना विरोधात लढा द्यायला हवा. सध्या एकत्र कुटुंब पद्धत राहिलेली नाही. तरीही माणूसच माणसाच्या कामाला येतो. मुंबईचे स्पिरिट काय असते, हे सगळ्यांनी एकत्र येऊन जगाला दाखवून देऊ या. रुग्णांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायला हवे. सातत्याने अशा रुग्णांच्या संपर्कात रहायला हवे, असे आवाहन डॉ. ललित आनंदे यांनी केले आहे.
'हसण्याची सोपी ट्रीटमेंट फायदेशीर'
क्षयरोग रुग्णालयात रुग्ण आल्यास टीबी होईल, या भीतीने नातेवाईक व मित्र रुग्णालयाकडे फिरकत नाहीत. रुग्णांची जबाबदारी यामुळे रुग्णालय प्रशासनावर पडते. असे रुग्ण पटकन बरे व्हावेत, यासाठी संगीत कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करुन रुग्णांचे मनोबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करतो. रुग्णांमध्ये कमी झालेली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चांगले विचार, दिलखुलास हसण्याची सोपी ट्रीटमेंट फायदेशीर ठरते, असे डॉ. आनंदे सांगतात. कोविड रुग्णांवर देखील अशीच ट्रीटमेंट उपयुक्त असून हास्य कलाकारांनी छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्णांना तणावातून बाहेर काढावे, असा सल्ला डॉ. आनंदे यांनी दिला आहे.
अशी करा ऑक्सिजन थेरपी
उंदीर, कुत्रे, मांजर आदी भटक्या प्राण्यांमध्ये डी जीवनसत्त्व मात्रा खूप चांगली आहे. त्यातुलनेत माणसाच्या शरिरातील डी जीवनसत्त्वाची मात्रा पुरेशी नाही. ती वाढविण्यासाठी बाजारात स्वस्त दरातील औषधे उपलब्ध आहेत. मात्र, या औषधांच्या आहारी जाऊ नये, असा सल्ला देतानाच ते म्हणाले की, उन्हामुळे शरिरात डी जीवनसत्व तयार होते. तर सी जीवनसत्व वाढविण्यासाठी लिंबू, मोसंबी, कलिंगड, डाळिंब आदी फळांचा आहार घ्यावा. माणसानी घरच्या घरी ऑक्सिजन थेरपीसाठी ध्यान धारणा आणि श्वसनाशी संबंधित व्यायाम करावेत. कोवळी उन्हे अंगावर घ्यावीत. त्याने डी जीवनसत्वाचे शरिरातील प्रमाण वाढेल. ज्यामुळे कोणत्याही आजाराच्या विषाणूंचा प्रतिकार करणे सहज सोपे होईल, असेही डॉ. आनंदे सांगतात. डोक्यावर छप्पर नाही असे, हजारो लोक निवाऱ्यासाठी फुटपाथ आणि पुलाखांली राहत आहेत. ऊन, पाऊस, थंडी, वारा ते झेलत असतात. त्यांची रोग प्रतिकार शक्ती चांगली असते. त्यामुळे ते कोरोनापासून दूर आहेत. सी आणि डी जीवनसत्वांचा त्यांचा अभाव नसल्याने त्यांचे आरोग्य ठणठणीत असते, असे डॉ. आनंदे यांचे म्हणणे आहे.