मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि त्यांचे कुटुंबीय राहत असलेली मुंबईतील पेडर रोड येथील प्रभुकुंज ही इमारत सील करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या इमारतीत कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही इमारत सील करण्यात येणार आहे.
प्रभुकुंज सोसायटीत शनिवारी 4 कोरोना बाधित रुग्ण सापडल्याचे मुंबई महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. या इमारतीत लता मंगेशकर यांच्यासह त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर, त्यांची बहिण उषा मंगेशकर हे देखील राहतात. मंगेशकर कुटुंबीयाशिवाय या इमारतीत अन्य घरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या इमारतीमधील पदाधिकारी यांच्याशी बोलून त्यानंतरच ही इमारत सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी जास्त होत असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रभुकुंज ही इमारत सील करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मंगेशकर कुटुंबीयांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात देखील सांगण्यात आले आहे. मात्र ही इमारत किती दिवसासाठी सील करण्यात आली आहे याबाबत पालिकेच्या वतीने कोणतंही स्पष्टीकरण अद्याप देण्यात आलेले नाही.