मुंबई - 24 एप्रिल हा दिवस खर तर दोन कारणांनी खास असतो. पहिलं म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आणि दुसरं म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची पुण्यतिथी...आजचा दिवस कायम वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा लता दिदींचा मानस असतो. दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येतं.
मुंबईतील षण्मुखानंद सरस्वती सभागृहात दरवर्षी आधी पुरस्काराचा आणि त्यानंतर संगीताचा कार्यक्रम रंगतो. अतिशय भव्य दिव्य स्वरूपात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तब्येत बरी असेपर्यंत स्वतः दिदी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहात असतं. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भावामुळे सर्व प्रकारचे जाहीर कार्यक्रम करायला बंधनं आली आहेत, त्यामुळे दिदींना यंदा हा कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. मात्र अस असलं तरीही हा दिवस वेगळा ठरावा यासाठी दीदींनी महिला तस्करी विरोधात लढणाऱ्या प्रीती पाटकर यांच्या 'प्रेरणा फाउंडेशन' या सामाजिक संस्थेला मास्टर दीनानाथ मंगेशकर फाउंडेशन तर्फे 5 लाख आणि वैयक्तिकरित्या 10 लाख अशी 15 लाखाची मदत देऊ केली आहे.
आपल्या वडिलांच्या स्मृति चिरंतन रहावी यासाठी दिदींनी सामाजिक उत्तरदायित्व कायम ठेवत आजचा दिवस विशेष ठरवला आहे. खर तर इतर कार्यक्रमाप्रमाणे हा कार्यक्रमदेखील रद्द झाला असता तर काही बिघडत नव्हतं. पुढच्या वर्षी कार्यक्रम करता येणं शक्य होतं. मात्र कार्यक्रम होऊ शकला नसला तरीही यानिमित्ताने होणाऱ्या समाजिक कामात खंड पडू नये यासाठी दीदींनी हे उचललेलं पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी यापूर्वीच दीदींनी पीएम केअर आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यात भरीव मदत केली आहे.