मुंबई - देशात कोरोनाचे संकट वाढत असल्याने मुंबईतील हवालदिल झालेले परप्रांतीय मजूर, कामगार, विद्यार्थी यांना केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नियोजन पद्धतीने त्यांच्या नोंदणी जवळच्या पोलीस ठाण्यात घेऊन वैदकीय प्रमाणपत्र जोडून गावी जाण्यासाठी सोडण्यात येणार आहे, मात्र, याकरिता परप्रांतीय मजूर लोक अतिशय घाई करत आहेत. आज मानखुर्द पोलीस ठाण्यासमोर अर्ज भरण्यासाठी मजूरांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीला रांगेत लावण्यासाठी पोलिसांना दमछाक झाली. याचे कारण लोक एकमेकांच्या जवळ येत असल्याने लॉकडऊनचे कोणतेही नियम पाळले जात नव्हते.
हेही वाचा... गावकऱ्यांची गांधीगिरी.. चार महिन्यानंतर गावात अवतरलेल्या ग्रामसेवकाचे पाय धुवून केले स्वागत
मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक आहे. गेल्या दीड महिन्यांपासून मुंबईतील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे हाताला काम नाही, त्यामुळे मुंबईत थांबण्यापेक्षा गाव जवळ करण्यासाठी परप्रांतीय मजूर गावी चालत किंवा मिळेल त्या वाहनाने धोका पत्करून जात होते. त्यामुळे केंद्राने मजूरांना गावी जाण्यासाठी पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मात्र, या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी केंद्राने विशेष श्रमिक रेल्वे सोडल्या असल्या, तरिही त्या प्रक्रियेसाठी प्रत्येक मजूर पोलीस ठाण्यांसमोर गर्दी करत आहेत.
मानखुर्द शिवाजीनगर या झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. येथे लोकसंख्या दरही अधिक असून सुविधा कमी असलेल्या या परिसरात लोकांनी गावी जाण्यासाठी धडपड सुरू केली. त्याचा ताण आता पोलिसांवर पडत आहे.