मुंबई - स्वतःचे घर घेणाऱ्यांसाठी एमएमआर(Mumbai Metropolitan Region)मधील पालघर, रायगड आणि ठाणे शहरांत म्हाडा प्राधिकरणा(MHADA)मार्फत घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण मंडळाकडून त्यासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुमारे २७४.११ हेक्टर क्षेत्र जमिनीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
पालघर, रायगड, ठाण्यात घरे
मुंबई मायानगरी असून येथे स्वतःच्या मालकीचे घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. सध्या मुंबई पालघर ते रायगड जिल्ह्यापर्यंत जोडली गेली आहे. दळणवळणाच्या सोयींमुळे मुंबईहून अधिक ठाणे, पालघर आणि रायगड भागातील घरांना मागणी वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण मंडळाने म्हाडाची घरे एमएमआर रिजनमध्ये बांधण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाने महसूल विभाग, जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जमिनींचा शोध घेतला आहे. आतापर्यंत सुमारे २७४.११ हेक्टरचा क्षेत्र शासकीय बाजारभावाने या खरेदी केली जाणार आहे. कोकण महामंडळाने त्या जागा खरेदीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने घरे उपलब्ध होतील, असा दावा करण्यात येतो आहे.
कळव्यात ३० हजार घर
म्हाडाने परवडणाऱ्या घरांच्या निर्मिती करण्यासाठी कळव्यातील मफतलाल कंपनीची जमीन ताब्यात मिळावी, अशी मागणी केली आहे. उच्च न्यायालयात अर्जदेखील केला आहे. या जमिनीवर ३० हजारांहून अधिक घरांचा मोठा प्रकल्प उभारणे शक्य होईल, असे म्हाडा कोकण महामंडळाचे म्हणणे आहे.