ठाणे - राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात अंशतः आणि पूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. ठाण्यात देखील कोरोनाबाधितांचे आकडे दररोज वाढत असल्याने हॉटेल, बार, दुकाने बंद करण्यात आली आहेत. बंद झालेल्या उद्योगामुळे त्यावर अवलंबून असलेल्या मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यांनी पुन्हा एकदा गावी निघून जाण्याचा निर्णय घेतला आहे.
रोजगार नाही आणि कामाचे पैसेही न मिळाल्याने त्रस्त झालेल्या मजुरांनी उत्तरप्रदेश बिहार मध्ये आपल्या गावी जाणे पसंत केले आहे. गेल्या काही दिवसात ठाण्यातून हजारो परप्रांतीयानी माजिवडा येथून मिळेल त्या वाहनाने आपल्या गावाकडे जात आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायाला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे गावी परतलेले मजूर दिवाळीनंतर परतले होते. परिणामी, राज्य सरकारला मोठे आर्थिक नुकसान झाले होते. तशीच परिस्थिती पुन्हा उद्भवल्याने सरकार समोर मोठा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास लेबरचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे.
ठाण्यात माजीवाडा नाका झाला बस अड्डा
उत्तरप्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, आणि गुजरातकडे जाण्यासाठी माजीवाडा नाका हा एक मोठा बस अड्डा झाला आहे. कामगार मिळेल त्या वाहनाने गावी जात आहेत. गावी जाण्यासाठी 1 हजार ते 3000 रुपये एवढे घेतले जात आहेत. एकीकडे रेल्वेत कन्फर्म तिकीट असणाऱ्या लोकांनाच प्रवेश दिला जात आहे.