मुंबई - पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरस्थितीतून सावरण्यासाठी पूरग्रस्तांना सर्व स्तरातून मदत पुरवली जात आहे. यात ससून डॉक येथील कामगारांनी देखील हातभार लावला आहे. सक्षम प्रतिष्ठानने दिलेल्या मदतीच्या हाकेला प्रतिसाद देत ससून डॉक येथील कामगारांनी पूरग्रस्तांना भरघोस मदत केली आहे.
कोल्हापूर आणि सांगलीत उद्भवलेल्या परिस्थितीतून पूरग्रस्तांना सावरण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू आहे. सेलिब्रेटींपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वजण आपापल्या परीने मदतीचा हात पुढे करत आहेत. अनेक संस्था, संघटनांनी देखील यात पुढाकार घेतला आहे. यात ससून डॉक येथील कामगारांनी देखील हातभार लावला असून कपडे, पाणी आणि धान्याच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रावर आलेल्या संकटात सापडलेल्या लोकांना मदत म्हणून आम्ही सक्षम प्रतिष्ठान मार्फत आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत ससून डॉक मधील हातगाडी आणि बोटीवर काम करणाऱ्या कामगारांना पाणी, धान्य आणि कपड्याची मोठ्या प्रमाणात मदत केली, अशी माहिती सक्षम प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश वराळ यांनी सांगितले.