मुंबई - कोरोनाशी आर्थिक पातळीवरही लढा द्यावा लागत असून मदतीचे अनेक हात आता पुढे येत आहेत. त्यानुसार आता देशातील पायाभूत सुविधा विकास प्रकल्पातील आघाडीची अशी एल अँड टी कंपनीही पुढे सरसावली आहे. कंपनीने 150 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर, आपल्या देशभरातील 16 हजार कामगारांसाठी 500 कोटींची तरतुद केली आहे.
कोरोनाशी लढा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा लागणार आहे. त्यामुळे पंतप्रधान साहय्यता निधी आणि मुख्यमंत्री साहय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला सेलिब्रिटी, खेळाडूपासून उद्योगपतींपर्यंत सर्व मदत करत आहेत. यात आता एल अँड टीची ही भर पडली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारक, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो, कोस्टल रोड असे मुंबईतील महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प एल अँड टी कडून राबवले जात आहेत. याच कंपनीने आता पुढे येत 150 कोटींची मदत केंद्राला दिली आहे. कंपनीचे अध्यक्ष ए. एम. नाईक यांनी ही माहिती दिली आहे. तर आपल्या 16 हजार कामगारांची जबाबदारीही कंपनीने उचलली आहे.