मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या चार एप्रिल रोजी भीमा-कोरेगाव आयोगासमोर साक्ष देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत आज (बुधवार) मंत्रालयात माहिती दिली.
हेही वाचा... ...तर सर्व दूरसंचार कंपन्यांच्या व्यस्थापकीय संचालकांना तुरुंगात पाठवू- सर्वोच्च न्यायालय
शरद पवार यांनी यापूर्वीच आयोगाला प्रतिज्ञापत्र देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, विवेक विचार मंच संस्थेचे सदस्य सागर शिंदे यांनी आयोगाकडे पवार यांना साक्ष देण्यासाठी बोलावण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पवार हे साक्ष देण्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती मलिक यांनी दिली. आयोगाकडूनच 'आपण साक्ष देण्यासाठी हजर रहावे, अशी विनंती पवार साहेबांना करण्यात आली होती. त्यामुळे पवार साहेबांनी 4 एप्रिल रोजी, आपण हजर राहणार असल्याचे आयोगाला कळवले आहे' असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... #Coronavirus: 'भाजप एक महिना कोणतंही आंदोलन करणार नाही'
'शरद पवार यांनी यापूर्वीच आपले संपुर्ण म्हणणे लेखी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून दिले आहे. पण मागील मुख्यमंत्र्यांना साक्ष देण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यांनी आयोगाला सहकार्य केलेले नाही. आणि लेखी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून तसे कळवलेही नाही. आयोग आपले काम करत आहे. मात्र, कोरेगाव भीमा येथील दंगल ही सुनियोजित होती. ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. यामुळे आयोगाकडून जे काही सत्य समोर येईल ते जनतेला कळेलच. संसदेचे अधिवेशन असल्याने शरद पवार हे ४ एप्रिल रोजी आयोगासमोर जाणार आहेत. तर या आयोगाची मुदत ही ८ तारखेला संपणार असली, तरी इतर आयोगाप्रमाणे त्यालाही सरकारकडून मुदतवाढ दिली जाईल' अशी माहिती मलिक यांनी दिली.