मुंबई - महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. यावर भविष्यात कोणताही धोका नको म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या जिल्हास्तरीय गटाने बैठकांना सुरुवात केली आहे. सोमवारी मुख्यमंत्री यांनी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांनी विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध होत नाही, अशा तक्रारी केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. तर, आज कोकणातील आमदारांची सह्यादी निवासस्थानी बैठक घेत आमदारांच्या मनातील खदखद समजून घेतली.
आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोकणातील आमदारांच्या जिल्ह्याचा आढावा घेतला. शिवसेना आमदार इतर कोणावर नाराज नाहीत, आमची कामं जलदगतीने व्हावी ही मागणी केली आहे, असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला शिवसेना आमदार भास्कर जाधव आणि कोरोना पोझिटिव्ह असल्यामुळे उदय सामंत हे अनुपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारे बैठका घेतल्यामुळे विकासकामे लवकर होण्यासाठी मदत होणार आहे. तसेच आजच्या बैठकीत नाणारचा मुद्दा नव्हता, असे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.
सोमवारपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या आमदारांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी बैठकींना सुरुवात झाली आहे. या बैठकांमध्ये मुख्यमंत्री आणि आमदारांनी समोरासमोर बसून मतदारसंघातील प्रश्न, निधीची कमतरता या प्रश्नांबद्दल चर्चा करण्यात येते. काल पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि आज कोकणातील आमदारांची बैठक घेण्यात आली. यात निधीच्या कमतरतेपासून मतदारसंघातील इतर प्रश्नांपर्यंतच्या विषयांवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या अडचणी समजून घेतानाचा ते प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिले आहे. शिवसेना आमदार आणि प्रवक्ते सुनील प्रभू यांनी याबाबत माहिती दिली.