मुंबई नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेने तब्बल 28 राज्यांचा सर्व्हे केला. यातून 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिलांचे एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर Multiple Sex Partners असल्याचे समोर आले. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या National Family Health Survey या निष्कर्षानुसार फक्त महिलाच नाही तर पुरुषांना देखील मल्टिपल सेक्स पार्टनर आहेत. त्यामुळे महिला असो अथवा पुरुष दोघांनाही या आपल्या खाजगी क्रिया करताना आरोग्याची देखील तितकीच काळजी घेणे गरजेचे आहे. तेव्हा मल्टिपल सेक्स पार्टनर असल्यामुळे आपल्या आरोग्यावर अथवा आपल्या कौटुंबिक जीवनात, वैवाहिक जीवनात नेमके काय परिणाम होतात? कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते?
तज्ज्ञ डॉक्टर काय सांगतात?
प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व प्रसूती तज्ञ डॉक्टर म्हणाल्या की, मल्टिपल सेक्स पार्टनर असल्यामुळे पुरुष असो अथवा स्त्री या दोघांच्याही आरोग्याला धोका संभवतो. आपल्याकडे बरेचसे आजार असे आहेत की जे मल्टिपल सेक्स पार्टनर असल्यामुळे पसरतात. या आजारांमध्ये HIV, HPV, HBS यासह इतरही अनेक आजार आहेत जे असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे पसरतात.
कर्करोगासारखे आजार होण्याची शक्यता
पुढे बोलताना डॉक्टर साधना पवार सांगतात की, मल्टिपल सेक्स पार्टनर असल्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये महिलांना ओटीपोटाचे जुनाट इन्फेक्शन होऊ शकते. जे त्यानंतर खूप त्रासदायक ठरते. अशाने काही वर्षानंतर गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. तर,ओरल सेक्समुळे तोंडाचा देखील कॅन्सर होण्याची अधिक शक्यता असते. आमच्या मेडिकल टम्समध्ये आम्हाला असे पेशंट आढळलेले आहेत.
असुरक्षित गर्भपात
आता आपण पाहिलं की महिलांना मल्टिपल सेक्स पार्टनर असल्यामुळे कर्करोगांसारख्या गंभीर आजारांचा देखील सामना करावा लागू शकतो. मात्र, अशात असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास काही वेळा गर्भधारणा देखील होण्याची शक्यता असते. अनेक वेळा हे संबंध छुपे असल्याने महिला आपल्या पोटातील गर्भ पाडण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा हे प्रयत्न अतिशय गावठी पद्धतीने केलेले असतात. यात क्वचितच तज्ञांचा सल्ला घेतला जातो. जे की बेकायदेशीर आहे. त्यामुळे अशा गर्भपाताने अनेक वेळा त्या महिलेचा जीव देखील धोक्यात येण्याची शक्यता असते. असुरक्षित गर्भपातामुळे त्या महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटना आपल्याकडे घडलेल्या आहेत.
पुरुषांना होणारे आजार
यात पुरुषांना होणाऱ्या आजारांबाबत सांगताना डॉक्टर साधना पवार म्हणाल्या की, पुरुषांना देखील एचआयव्ही सारख्या आजारांची रिस्क आहेच. महत्वाची बाब म्हणजे पुरुषांनाही शिश्नाचा कर्करोग, प्रोस्टेट कॅन्सर होण्याची देखील शक्यता वाढत जाते. यात एचआयव्ही असेल अथवा हिपॅटिक बी म्हणजे ब प्रकारची कावीळ या आजारांसाठी आपल्याला अद्यापही ठोस उपचार सापडलेले नाहीत. यावर अद्यापही संशोधने सुरू आहेत. मात्र, सध्या तरी या आजारांवर ठोस उपचार नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचे आजार झाल्यास तुम्हाला त्या आजारांसोबतच आपले पुढचे आयुष्य जगावे लागते. यात तुम्हाला यकृताचे आजार म्हणजे यकृतात जळजळ होणे, यकृताचा कॅन्सर देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा तुमच्या लैंगिक क्रिया करता त्यावेळी पुरेशी काळजी घेणे तितकच गरजेचे आहे.
कौटुंबिक आणि मानसिक ताण
असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे जेव्हा एखाद्या महिलेची गर्भधारणा होते आणि जेव्हा ती त्या आपत्याला जन्म देते त्यावेळी त्या बाळाच्या संगोपनाचा देखील प्रश्न उपस्थित राहतो. आणि, अशा प्रकारचे संबंध जेव्हा कुटुंबात उघड होतात त्यावेळी त्या कुटुंबात एक वादळासारखीच परिस्थिती निर्माण झालेली असते. यातून मानसिक ताण येतो. हे सर्व कधी कधी अगदी भांडणे मारामाऱ्या किंवा सुसाईड पर्यंत देखील पोहोचू शकत. याचा तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्या मुलांच्या मनावर देखील अतिशय वाईट परिणाम होत असतो. या मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होतो. असे डॉक्टर पवार सांगतात.
बदलत्या जीवन शैलीचा वैद्यकीय क्षेत्रावर ताण
बदलत्या जीवनशैलीनुसार ज्याप्रमाणे डायबेटिस, हायपरटेन्शन असे आजार विक्राळ रूप धारण करून सध्या समोर येत आहेत. त्याचप्रमाणे एचआयव्ही असेल किंवा ब प्रकारची कावीळ अशा आजारांचे प्रमाण देखील वाढल्याचं सर्वे मधून समोर आलेला आहे. अनेक अल्पवयीन मुली प्रेग्नेंट असल्याच्या अनेक केसेस आमच्यासमोर यापूर्वी आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा होणारा गर्भपात, त्या अल्पवयीन मुलीला असलेल्या जीवाचा धोका अशा अनेक समस्या सध्या वैद्यकीय क्षेत्र समोर आहेत. त्यात अनेक आजारांवर अद्याप औषध उपचार देखील उपलब्ध नाहीत. त्यावर संशोधन सुरू आहे. अशी माहिती डॉक्टर साधना पवार यांनी दिली. दरम्यान, या संवादात डॉक्टर पवार यांनी सांगितलेला एक अतिशय महत्वाचा आहे. त्या सांगतात आपलं कल्चर बदलतंय, आपली जीवनशैली बदलतेय. हे बदल जसे चांगल्या स्वरूपाचे आहेत तसेच त्याचे वाईट स्वरूपाचे देखील बदल आहेत. त्यापैकीच हे मल्टिपल सेक्स पार्टनरचा प्रकरण. आपल्या कुटुंब पद्धतीत एकनिष्ठतेला महत्त्व आहे. काही वेळा हे जरी जुनाट विचारांच वाटलं तरी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ही एकनिष्ठता अतिशय महत्त्वाची आहे.
हेही वाचा Kareeza Technique तुमचे लैंगिक जीवन वाढवण्यासाठी अवलंबा करिझा तंत्र