मुंबई : मुंबईत अनेक पुरातन वास्तू, मंदिरे आणि शिल्पाकृती आहेत. परळमध्ये बारादेवी पुरातन मंदिर त्यापैकी एक (Baradevi Ancient Temple in Paral) आहे. एका अकरा फुटी उंच आणि ५ फूट रुंदीच्या दगडावर बारा मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. या मंदिराला पुरातन वास्तूचा दर्जा देण्यात आला (history of Baradevi Ancient Temple in Paral) आहे.
नावाचा इतिहास - परळ-शिवडी रस्त्याचे काम चालू असताना एक अपूर्णावस्थेत असलेली मूर्ती सापडली. साधारणतः इ.स. ५०० च्या आसपासमधील घटना असावी. ही मूर्ती ११ फूट उंच व पाच फूट सहा इंच रुंद मूर्ती आहे. ती अपूर्ण असली, तरी तिचे शिल्पकाम अतिशय सुंदर आहे. शिल्पातील मुर्तीवर एकूण बारामूर्ती कोरलेल्या असून मध्यभागी एकउभी शिवाची प्रतिमा आहे. यामूर्तीच्या पायाजवळ बसलेल्या पाच प्रतिमांपैकी तीन काहीशा अपूर्णावस्थेतील असलेल्या दिसतात.
मुख्य शिवप्रतिमेतून आणखी सहा प्रतिमा उद्भवताना दाखवल्या आहेत. मध्यभागी असलेल्या सर्वोच्च मूर्तीला चार हात असून इतर सर्व अर्धमूर्ती व मूर्तींना दोन हात दाखवले आहेत. या साऱ्याच मूर्तींनी छोटे मुकुट परिधान केलेले असून नागादि लांछनेही पाहायला मिळत आहेत. अशा बारा मूर्तींमुळे या शिल्पपटाला स्थानिकांनी बारादेवी असे नाव दिले (know the history of Baradevi Ancient Temple) आहे.
काळ्याशार मूर्तीशिल्पावर मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या पायाजवळ वादक दिसून येत आहेत. डाव्या पायाजवळ दोन वादक असून, एका वादकाचे कोरीव काम अर्धवट आहे. दुसरा वादक बर्मीस हार्पसारखे तंतुवाद्य वाजवत असताना दिसतो आहे. हे वाद्य ब्रह्मदेश किंवा म्यानमार या देशात वापरले जाते, असे अभ्यासक सांगतात. उजव्या पायाजवळ तीन वादक आहेत. एक वादक बासरी वाजवत असून, दुसरा वादक पिपासारखे चिनी वाद्य वाजवताना दिसतो आहे. याला सप्तशीव असेही म्हटले जाते.
परळची गावदेवी म्हणून ओळख - मंदिराच्या मागेच चंडिकादेवीचे मंदिर आहे. ती परळची गावदेवी म्हणूनही ओळखली जाते. हे मंदिर व त्यातील शिल्पे इ. स. १३००मधील आहेत. पुढे चंडिका मंदिरामागील अंगणात विसावलेल्या इ. स. १३००मधील शिल्पांचा संग्रह आहे. शूर योद्धे आणि पडलेल्या राजांचे वीरगळ (हीरो स्टोन) येथे दिसून येतात. त्यावर सिंह आहेत. एक गायीचे वासरू, पाळणा इत्यादी शिल्पे दिसून येतात. बारादेवी मंदिराच्या दक्षिणेस वाघेश्वरी मंदिर असून, येथेही पुरातन शिल्पे आहेत.
कसे जायचे - मध्य रेल्वेच्या परळ किंवा वेस्टर्न रेल्वेच्या एल्फिन्स्टन आणि आताचे प्रभादेवी स्टेशन उतरून पूर्वेला बाहेर आलात की परळ - एल्फिन्स्टन आताचा प्रभादेवी स्टेशनचा ब्रिज लागतो. त्याखालून किर्तीमहल किंवा पालिकेचे प्रभाग कार्यालय जवळून १६२ क्रमांकाची बस पडकायची. परळ गावला उतरायचे. येथून हाकेच्या अंतरावर बारादेवी मंदिर आहे. केवळ सहा रुपये बस भाडे आहे. मंदिराजवळ चालत जाणे सुद्धा सोयीस्कर आहे. सुमारे २० मिनिटे अंतर चालायला लागतात. हार्बर रेल्वेच्या शिवडी स्टेशनवरून ही जाता येते. येथून १० मिनिट चालत जायला लागते.