मुंबई - परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या प्राथमिक सीबीआय चौकशीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत. मुंबई न्यायालयाने ज्या याचिकेवर हा निर्णय दिला ती याचिका अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केली होती. न्यायालयाच्या सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना पाटील यांनी गृहमंत्र्यांना थेट धारेवर धरत "देशमुख साहेब मोगलाई आहे काय?" असा प्रश्न केला, "भले तुम्ही किती ही मोठे मराठा नेते असाल परंतु शेवटच्या श्वासापर्यंत लढा देईन" असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला. थेट राज्याच्या गृहमंत्र्यांना अडचणीत आणणाऱ्या अॅड. जयश्री पाटील नेमक्या कोण आहेत असा प्रश्न अनेकांना पडलाय.
कोण आहेत अॅड. जयश्री पाटील?
अॅडव्होकेट जयश्री पाटील यांचे नाव या प्रकरणापूर्वी मराठा आरक्षण प्रकरणीदेखील चांगलंच चर्चेत आलं होतं. त्या स्वतः मराठा समाजातील आहेत. तरीही मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका ही अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जयश्री पाटील यांच्या माध्यमातूनच दाखल केली होती. मराठा आरक्षणाला या याचिकेच्या माध्यमातून जयश्री पाटील यांनी विरोध केला आहे. हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टातही त्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात बाजू मांडलेली आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. एल. के. पाटील यांच्या जयश्री पाटील या कन्या आहेत. मानवाधिकारांबाबत त्यांचे काम असून त्यांनी या विषयावर आधारित अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत. तसेच मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी भूमिका बजावलेली आहे. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी अॅड. जयश्री पाटील यांच्याकरवी मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल केली होती.
जयश्री पाटील यांनी हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवला होता. जयश्री पाटील यांनी राज्य सरकारच्या मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून सात वर्ष काम पाहिले आहे. त्यांनी मानवाधिकारांबाबत अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.