मुंबई - दैनंदिन जीवनातील मराठी भाषेचे महत्व लक्षात घेता मराठी भाषा टिकवणे ही काळाची गरज असल्याचे मत अभिनेते-लेखत किशोर कदम यांनी मांडले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म दिवस 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. मुंबई महापालिकेतही पालिका स्तरावर 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
मराठी भाषा ही संतांनी रचलेली आहे. अभंग, भारुडे, कोळीगीते, पोवाडे यांच्यातून ती साकारली असून सातारा, कोल्हापूर, कोकण खान्देशासह सर्व ठिकाणचा मराठी 'लहेजा' ऐकायला गोड वाटतो, असे ते म्हणाले. तसेच या लहेजाची लाज बाळगण्याची कोणतेही कारण नसल्याचे कदम यांनी म्हटले. जशी येईल, तशी गावाकडील भाषा बोलल्याने मराठी भाषा टिकून राहील, असे कदम म्हणाले.
शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मराठी साहित्याची गोडी लावली पाहिजे. तसेच त्यांना मराठी विषय सक्तीचा करण्याची आवश्यकता असल्याचे किशोर कदम म्हणाले.