सोलापूर - प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी 'बिग बॉस मराठी'मध्ये सहभाग घेतला होता. बिग बॉसमध्ये सहभागी झाल्याने त्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्या होत्या. त्यांच्यावर चौफेर टिका करण्यात येत होती. त्यानंतर त्यांनी आजारी असल्याचे कारण देत या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांनी सर्व प्रेक्षकांची माफी मागितली आहे. माझा वेगळे उद्देश होता, असे त्यांनी म्हटले आहे.
हेतू प्रामाणिक पण, मार्ग चुकला -
शिवलीला पाटीलने सर्वांची माफी मागितली आहे. त्या म्हणाल्या, की मी बिग बॉसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याने माझा सर्व वारकरी संप्रदाय आणि माझे सर्व ज्येष्ठ लोक माझ्यावर नाराज झाले. त्यांना नाराज करण्याचा माझा उद्देश नव्हता. मी या सर्वांची दोन्ही हात जोडून आणि मस्तक टेकून माफी मागते. माझी चूक झाली. मी माझे विचार सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्ग चुकीचा निवडला असला तरी माझा उद्देश अतिशय प्रामाणिक आणि चांगला होता. मला चुकीचे काही करायचे नव्हते, असे म्हणत शिवलीला पाटीलने सर्वांची माफी मागितली आहे. शिवलीला ही महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय महिला कीर्तनकार आहे. ती मुळची सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावाची आहे. फार कमी वयात तिने कीर्तनाला सुरुवात केली होती.
हेही वाचा - गृहमंत्र्यांनी सर्व पोलीस अधीक्षक आणि आयुक्तांची बोलावली महत्वपूर्ण बैठक