मुंबई - गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटीच्या वसूलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात उडालेला धुराळा अद्याप शमलेला नाही. अशास्थितीत भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी गृहनिर्माण खात्यावर पर्यायाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप केला. गृहनिर्माण खात्यातही मोठं वसूली रॅकेट सुरु असल्याचा दावा सोमैय्या यांनी केला आहे.
किरीट सोमैय्या यांचे आरोप?
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या आशीर्वादाने एसआरए, म्हाडा, बीएमसी इथं 100 बिल्डरची यादी, 100 आरटीआय, मंत्री महोदयांचे आदेश घेऊन प्रविण कलमे हे गेले काही महिने वसुली गँग चालवत आहेत. त्याबाबत किरीट सोमैय्या यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक प्रभात कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. यावेळी काही पुरावेही दिल्याचा दावा सोमैय्या यांच्याकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा - लॉकडाऊन लावू नका, काँग्रेस नेते संजय निरुपमांचे हॉटेल व्यावसायिकांसह आंदोलन
100 रुपये प्रती फूट हा सध्याचा एसआरए, म्हाडाचा बिल्डरांसाठी दर चालत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रति महिना 100 कोटी रुपये वाझे गँगकडून हवे असतात तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे वाझे म्हणजे प्रविण कलमे हे महापालिका, म्हाडा, एसआरए मध्ये 100 बिल्डर्सच्या विरोधात 100 आरटीआय करतात. त्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड त्वरित अहवाल सादर करावा असे आदेश देतात. लगेच एसआरए असो, म्हाडा असो यांचे ‘वसुली गँग’चे अधिकारी कामाला लागतात.असा आरोप किरीट सोमैय्या यांनी लावला
सोमैय्या यांनी या प्रकरणात प्रभात कुमार यांच्याकडे तक्रार आणि 100 पानांचे पुरावे दिले आहेत. त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, प्रविण कलम, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित अधिकारी, म्हाडाचे अधिकारी यांची चौकशी करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या गंभीर आरोपांवर आता जितेंद्र आव्हाड काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा - INTERVIEW : सचिन वाझे, विनायक शिंदे प्रकरणी माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी धनराज वंजारींसोबत बातचीत