मुंबई मालाडमधील भाटी गावातील कोळी समाजाची स्मशानभूमी तोडल्या प्रकरणी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे, अशी ठाम भूमिका भाजप नेते किरीट सोमैयां( BJP leader Kirit Somaiyan ) यांनी घेतली आहे. किरीट सोमैयां हे दापोली दौऱ्यावर असून त्यांनी या संबंधित भाष्य केले आहे.
नोटीस न देता कारवाई का ? मालाडमधील भाटी गावातील कोळी समाजाची स्मशानभूमी तोडण्यापूर्वी मच्छीमारांच्या सोसायटीला कारणे दाखवा नोटीस न बजावता आणि सुनावणी ही न देता ही तडक कारवाई केल्यामुळे कालच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता व न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, निधी चौधरी यांच्यावर कडक ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणावरून आता भाजप नेते किरीट सोमैयां यांनी सुद्धा निधी चौधरींवर कारवाई व्हायला पाहिजे, अशी मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण ? मालाडमधील भाटी गावातील कोळी समाजाची स्मशानभूमी १९ फेब्रुवारी १९९१ रोजीच्या सीआरझेड अधिसूचनेपूर्वीपासून अस्तित्वात होती, असे मुंबई न्यायालयासमोर सादर केलेल्या मृत्यू नोंद वहीतील अनेकांच्या नोंदीतून स्पष्ट झाले आहे. या कारणामुळे ही स्मशानभूमी पाडताना मच्छीमारांच्या सोसायट्यांना तसेच तेथील लोकांची सुनावणी घेऊन नंतर याबाबत भूमिका घ्यायला हवी होती. परंतु, मुंबई उपनगर, जिल्हाधिकारी, निधी चौधरी यांनी अशी कुठलीही प्रकारची भूमिका न घेता थेट स्मशानभूमी उध्वस्त केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत. मालाड, मढ इथेच काँग्रेस नेते, माजी मंत्री असलम शेख यांच्या आशीर्वादाने ४९ अनधिकृत स्टुडिओ बांधले गेले आहेत. परंतु त्यावर कारवाई का केली जात नाही ? ते जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास येत नाही का ? असे सांगत आता किरीट सोमैया यांनी निधी चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.