मुंबई - क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीच्या तपास यंत्रणेवरून राजकारण तापलेले आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चालू झाल्या आहेत. एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या तपास कार्यप्रणालीवर महाविकास आघाडी सरकारमधील नेते संशय व्यक्त करत आहेत. त्यामुळे राज्य सरकार खुन्नसने वानखेडे यांच्यामागे लागलेले आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे.
हेही वाचा - किरण गोसावीने शरण येण्यासाठी संपर्क साधला नाही - पुणे पोलीस
- विषय वळवण्यात ठाकरे-पवारांना यश -
ठाकरे सरकारची माफियागिरी सुरू आहे. समीर वानखेडेसारखा एक तरुण अधिकारी माफियागिरी विरोधात पुढे जात आहे. त्यामुळे हे सरकार खुन्नसने त्यांच्या मागे लागले आहे, असे किरीट सोमैया म्हणाले. ठाकरे सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर आले, तो विषय वळवण्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना यश आले आहे. म्हणूनच समीर वानखेडे यांना या प्रकरणात जाणूनबुजून गोवण्यात येत आहे, असा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे.
- अनिल देशमुख कुठे आहेत?
शंभर कोटी खंडणी वसुली प्रकरणात बेपत्ता असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख व माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे अद्याप बेपत्ता आहेत. त्यांच्यावरसुद्धा किरीट सोमैया यांनी निशाणा साधला आहे. अनिल देशमुख फरार आहेत याचे उत्तर मुख्यमंत्री का देत नाहीत? ठाकरे सरकारला माहीत आहे की त्यांचे घोटाळेबाज नेते चोरीलबाडी करत आहेत, तरीसुद्धा ठाकरे सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पण एक दिवस पाणी त्यांच्या पायाखाली येणार आहे, असेही किरीट सोमैया यांनी सांगितले आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांना टार्गेट करून त्यांचा तपास निष्प्रभ करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यांना पुढे करून विषय वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवाब मलिकांचा जावई आणि आर्यन खान याची चर्चा घडवून इतर घोटाळे लपतील असे वाटत असेल तर तसे समजू नका, असा इशाराही किरीट सोमैया यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
हेही वाचा - एनसीबी आणि प्रभाकर साईलच्या सुरक्षा मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांसोबत झाली चर्चा - गृहमंत्री