मुंबई- बिहारमध्ये एका 7 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून 20 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी कांदिवली परिसरातून अटक केली आहे. तसेच मुबारक अन्सारी या 7 वर्षाच्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. दरम्यान, मुंबई पोलिसांनी आरोपीला बिहार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
बिहारमधील चंपारण्य येथून मुबारक अन्सारी या 7 वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले होते. अपहरण केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. ही खंडणी मुंबईतील कांदिवली परिसरातून मागण्यात आल्याचे बिहार पोलिसांना आढळून आले. याची माहिती मुंबई पोलिसांना दिल्यानंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने यावर तात्काळ कारवाई केली. तसेच खंडणीसाठी फोन करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी रियाझउद्दीन अंसारी या आरोपीच्या मुसक्या मुंबई पोलिसांनी आवळल्या असून त्यास बिहार पोलिसांकडे देण्यात आले आहे.
दरम्यान, सुशांत सिंग राजपूत प्रकरणी राजकारण केले जात आहे. बिहार पोलिसांचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी सुद्धा मुंबई पोलिसांच्या तपासावर टीका केली होती. मात्र, मुंबई पोलिसांवर नाहक टीका टिप्पणी होऊन सुद्धा एका सात वर्षाच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईचं बिहार पोलिसांकडून कौतुक केले जात आहे.