मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत ही आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. शिवसेनेशी कंगनाच्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्याचे बोलले जात आहे. आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही भेट होईल, त्यानंतर सोमवारी ती मुंबईहून परत जाणार असल्याची माहिती समजली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्यामधील ट्विटर वॉर, आणि त्यानंतर कंगनाच्या घरावर झालेली कारवाई यामुळे सध्या दोघांदरम्यानचे वातावरण चांगलेच तापले आहे. कंगनाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलिसांच्या कार्यावर अविश्वास व्यक्त करत मुंबला पाकव्याप्त काश्मीर म्हटले होते. त्यानंतर हा वाद सुरू झाला होता.
दरम्यान, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही शनिवारी राज्यपालांची भेट घेत, कंगनाला न्याय मिळवून देण्याची, तसेच नुकसान भरपाईही मिळवून देण्याची मागणी केली होती. तर राज्यपाल कोश्यारींनी कंगना प्रकरणात आपला काहीही संबंध नसल्याचे यापूर्वी जाहीर केले आहे.
हेही वाचा : कंगना रणौत प्रकरणाशी संबंध नाही; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे स्पष्टीकरण