मुंबई - पीएमकेअर्स फंडातून केंद्र सरकारने पुरविलेल्या व्हेंटिलेटरच्या सुमार दर्जाबाबत काँग्रेसने आवाज उचलल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या व्हेंटिलेटरच्या ऑडीटची घोषणा केली. मात्र घोषणा पुरेशी नसून सत्यसमोर येण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने संयुक्त तपासणी करावी. तसेच या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
ऑडीट पुरेसे नाही, दोषींवर कारवाई करा -
कोरोना काळात पीएमकेअर्स या फंडातून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकार व्हेंटिलेटर पुरवत आहेत. मेक इन इंडिया उपक्रमात काही कंपन्यांना हे व्हेंटिलेटर बनवण्याचे काम देण्यात आले. गेले वर्षभर गुजरातसह विविध राज्यांतून या व्हेंटिलेटरच्या दर्जा व उपयुक्ततेच्या बद्दल आक्षेप घेण्यात आले. आता औरंगाबाद मेडिकल कॉलेजला गुजरातवरून देण्यात आलेले व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारने यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने यावर आक्षेप घेत आवाज उठवताच पंतप्रधानांनी ऑडीटचे निर्देश दिले आहेत. मात्र ऑडीट पुरेसे नसून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
गैरव्यवहाराबाबत काँग्रेस आवाज उठवणार -
दर्जाहीन व्हेंटिलेटरमुळे अनेक शासकीय वैद्यकीय अधिकारी घाबरले आहेत. तर महाराष्ट्रात अनेक व्हेंटिलेटर विनावापर पडून आहेत. नाशिक, औरंगाबाद व इतर ठिकाणी अशीच अवस्था आहे. तरीही केंद्र सरकारने याबाबत सारवासारव केली व औरंगाबाद मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय तज्ज्ञांचा अहवालही धुडकावून लावला. यामुळे सत्य समोर येईल की नाही याबाबत साशंकता आहे. या प्रकरणाची सखोल चौकशीसाठी केंद्र आणि राज्य सरकारचे संयुक्त ऑडिट करावे, अशी मागणी सावंत यांनी केली. तसेच केंद्र सरकारच्या गैरव्यवहारबाबत काँग्रेस यापुढेही आवाज उठवेल, असा सुचक इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा : नाशिक - भाजपा नगरसेविकेच्या पतीचा राडा, थेट रूग्णालयात इनोव्हा कार घुसवून तोडफोड