मुंबई- मनसुख हिरेन आणि रश्मी शुक्ला या दोन्ही प्रकरणात भाजपकडून भुई थोपटण्याचे काम करण्यात येत असल्याचा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. भाजपच्या काही नेत्यांकडून सध्या प्रसारमाध्यमांसमोर येऊन संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणातदेखील अशाच प्रकारचे संभ्रम करणारे वक्तव्य भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत. रश्मी शुक्ला यांनी अवैधरित्या फोन टॅपिंग केले, त्याप्रकरणातदेखील भाजपच्या नेत्यांकडून प्रसारमाध्यमांसमोर संभ्रम निर्माण केल्याचे पाहायला मिळत असल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला.
हेही वाचा-फोन टॅपिंग प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल
हे भाजप नेत्यांना ठाऊक नाही का ?
मनसुख हिरेन हत्या प्रकरणांमध्ये शवविच्छेदन अहवालात मनसुख हिरेनच्या तोंडात कोंबलेल्या रुमालाबद्दल उल्लेख का नाही ? अशा प्रकारचा प्रश्न भाजप नेत्यांकडून विचारण्यात येत आहे. मात्र, रुमाल हा पुरावा असून तो रुग्णालयात नेला जात नाही. तर मृताच्या शरीराजवळ रुमाल किंवा ज्या वस्तू सापडतात त्या पुरावा म्हणून पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्या जातात. हे भाजप नेत्यांना ठाऊक नाही का ? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.
हेही वाचा-यापुढे चुकीला माफी नाही, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा
रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणातदेखील भाजपच्या हाती काही लागले नाही. फोन टॅपिंग रिपोर्टमध्ये कोणाचेही नाव नाही. या प्रकरणातदेखील भाजप केवळ भुई थोपटण्याचे काम करत आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला रिपोर्ट जितेंद्र आव्हाड यांनी लिहिला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्यावर आव्हाड म्हणाले की, भाजपचा आता अधिकाऱ्यांवरदेखील विश्वास राहिलेला नाही.
जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि एटीएस प्रमुखांची बैठक
जितेंद्र आव्हाड यांच्या सरकारी निवासस्थानी गृहमंत्री अनिल देशमुख आणि एटीएस प्रमुख जयजीत सिंग यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि रश्मी शुक्ला यांचा फोन टॅपिंग प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे.
दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणामध्ये रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. अशातच मुंबई पोलिसांच्या सायबर सेल विभागाकडे राज्य गुप्त वार्ता विभाग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.