मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) हे गेल्या दोन दिवसापासून दिल्ली दौऱ्यावर होते. महत्त्वाच्या गाठीभेटी घेतल्यानंतर काल रात्री मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Union Home Minister Amit Shah ) यांची उशिरा रात्री भेट घेऊन मुंबईत आल्यानंतर आज सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट ( Jitendra Awhad met the Chief Minister ) घेतली.
भेटीचे कारण अद्याप अस्पष्टच - या दोन्ही नेत्यांमधील भेटीचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. जितेंद्र आव्हाड हे राज्याचे तात्कालीन गृहनिर्माण मंत्री असताना म्हाडा संदर्भाचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार हा मंत्र्यांकडे होता. मात्र, आता पुन्हा एकदा निर्णय घेण्याचा अधिकार म्हाडा विभागीय मंडळ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यासोबतच जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडा संदर्भात घेतलेले निर्णयही रद्द करण्यात आले होते. त्यामुळे या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचे कयास लावले जात आहेत.
संजय शिरसाट शिंदेच्या भेटीला - दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही सकाळी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला देखील संधी मिळावी अशी आशा आमदार संजय शिरसाठ यांची आहे. तसंच एकनाथ शिंदे गटातून महत्त्वाची पद देण्यात आलेल्या यादीत संजय शिरसाठ यांचं नाव नव्हतं. त्यामुळे एकनाथ शिंदे गटात संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने केली जाते. मंत्रिमंडळ विस्तार, नाराजी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संजय शिरसाट यांनी. भेटीदरम्यान चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.