मुंबई - सध्या राज्यात कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागेल का? अशी भीती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीशी मुख्यमंत्री लढा देत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी कोरोनाबाधित असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मात्र अशाही परिस्थितीत मुख्यमंत्री महाराष्ट्र सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे सोपे आहे. पण उद्धव ठाकरे बनणे कठीण आहे. असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना लगावला आहे.
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील कोरोना परिस्थिती जनतेसमोर मांडली. राज्यात कोरोना संकट भिषण आहे. कोरोनाबाधित रुग्ण असेच वाढत राहिल्यास लॉकडाऊन लावावे लागेल, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान यानंतर पत्रकार परिषद घेऊन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका करत, पाश्चिमात्य देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर तेथील सरकारने जनतेला कशी मदत केली याची आकडेवारी मांडली.
फडणवीसांच्या टीकेला आव्हाडांचे प्रत्युत्तर
यावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांवर निशाणा साधत, त्या देशांना तेथील केंद्र सरकारने मदत केल्याचे म्हटले आहे. आपले केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे दिले नाहीत. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे सोपे आहे, मात्र उद्धव ठाकरे बनणे कठीण असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.
हेही वाचा - अँटिलिया स्फोटके प्रकरण: सचिन वाझेची 'एनआयए' कोठडी वाढवली