मुंबई - भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी विरोधीपक्षनेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपाला रामराम ठोकला असून येत्या शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबंधित वृत्ताला दुजोरा देत खडसेंवर अन्याय झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
भाजपात खडसेंवर अन्याय
भाजपात खडसेंवर अन्याय झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. येणाऱ्या काळात भाजपातील आणखी काही नाराज नेते राष्ट्रवादीत येण्याची शक्यता यामुळे बळावली आहे.
राज्यातील खान्देश प्रांतात त्यांचा राजकीय दबदबा आहे. मात्र मागील काही वर्षांपासून त्यांना पक्षात डावलण्यात आल्याचे चित्र होते. अखेर खडसे यांनी भाजपाला जय महाराष्ट्र करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.
शरद पवारांशी गाठीभेटी
अनेक दिवसांपासून त्याची पक्षात होणारी कुचंबणा कार्यकर्ते मांडत होते. यानंतर काही दिवसांनी खडसे आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली. त्यावेळीपासूनच खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्त होते. अखेर आज याला दुजोरा मिळाला असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिक्कामोर्तब केले आहे.