मुंबई - सीएसएमटी पुल कोसळून काल अतिशय दुर्दैवी घटना घडली. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. त्यानंतर ही घटना घडली. ऑडिट करताना वरवर काम केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ३० जण जखमी झाले आहेत. जखमींना जीटी रुग्णालयात भेट दिल्यानंतर ते प्रसारमाध्यांशी बोलत होते. जीटीच्या महिला कर्मचाऱ्यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी काही लाखांची मदत जाहीर केली. पण त्याने काही होत नाही. ज्यांचा मृत्यू झाला त्यांची लहान मुले आहेत. कुटुंबातील जबाबदार व्यक्तीला सरकारी नोकरीत तातडीने रुजू करा, अशी मागणी पाटील यांनी केली.
ज्यावेळी ही दुर्घटना झाली त्यावेळी पालिका आणि रेल्वे विभागाने टोलवाटोलवी केली. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी भुयारी मार्ग निर्माण करण्याची मागणीही त्यांनी केली. भाजप-शिवसेनेला या घटनेचा जाब विचारला पाहिजे. सरकारचे कामाकडे लक्ष नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.
शिवसेना या घटनेकडे गांभिर्याने का पाहत नाही, असे विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनाप्रमुख युती करण्यात गर्क आहेत. ते सत्ता मिळवण्यासाठी मग्न आहेत. म्हणून येथे यायला त्यांच्याकडे वेळ नाही. खरंतर त्यांना मुंबईची चिंता कधीच नव्हती. मुंबईचे वाटोळे शिवसेना केल्याचे ते म्हणाले. माजी मंत्री सचिन अहीर यांनीही या घटनेचा निषेध करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.