मुंबई- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची एकमताने निवड झाली आहे. येत्या 15 डिसेंबर रोजी होणाऱ्या नाट्य परिषदेच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या रंगकर्मींना 20 सप्टेंबरपर्यंत आपली नावे नाट्य संमेलनाच्या कार्यकारिणी समितीकडे पाठवण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार दिलेल्या मुदतीत डॉ. जब्बार पटेल आणि अभिनेते मोहन जोशी यांचे अर्ज कार्यकरिणीला प्राप्त झाले होते. चर्चेअंती डॉ. जब्बार पटेल यांची निवड या पदासाठी करण्यात आली असून निवडीची घोषणा करण्याची औपचारिकता फक्त बाकी आहे.
नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि नाट्य परिषदेचे प्रवक्ते मंगेश कदम यांनी आज एक व्हिडीओ जाहीर करून ही माहिती दिली.
डॉ. जब्बार पटेल यांचा अल्प परिचय-
डॉ. जब्बार पटेल यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तम नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यात विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या घाशीराम कोतवाल या नाटकाने रंगभूमीवर इतिहास घडवला. या नाटकाला सुरुवातीला झालेला प्रखर विरोध आणि त्यांनतर त्याला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद यामुळे या नाटकाला मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड मानलं गेलं. या नाटकाचे दिग्दर्शक म्हणून जब्बार देशभरात गाजले. 100वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन पार पडणार असताना अशा व्यक्तीला नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळणे हे मराठी नाट्यसृष्टीसाठी निश्चितच आनंददायक आहे.