मुंबई - कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सामान्य जनतेसाठी बंद ठेवण्यात आलेली लोकल रेल्वे लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून काम केले जात आहे. आठवडाभरमध्ये लोकल रेल्वे सर्वांसाठी कशा प्रकारे सुरू करण्यात येईल ? गर्दीचे नियंत्रण कसे करता येईल ? व कोरणा संक्रमणाचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून काय उपाय योजना करण्यात याव्यात? याविषयी उच्चस्तरीय समिती सध्या काम काम करीत आहे. लवकरच याबाबत योग्य तो निर्णय घेऊन सर्वांसाठी लोकल रेल्वे सुरू करण्यात येईल असे राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
वकिलांनी केली होती याचिका दाखल
या अगोदर मुंबई उच्च न्यायालयात वकिलांना न्यायालयीन सुनावणीसाठी लोकल रेल्वेने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी म्हणून याचिका दाखल करण्यात आली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते. आतापर्यंत अनलॉकच्या दरम्यान बऱ्याच गोष्टी लोकांसाठी सुरू करण्यात आलेल्या असून लोकल रेल्वे सामान्य जनतेसाठी खुली करण्यामध्ये काय अडचण आहे? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली होती. त्यानंतर राज्य सरकारकडून आठ दिवसात या विषयी निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने 13 जानेवारीपर्यंत त्यावरील सुनावणी तहकूब केली आहे.