मुंबई - कोरोना प्रतिबंधित कोविशिल्ड लसीला प्रचंड मागणी असताना, देशात लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. लस मिळत नसल्याने दुसरा डोस चुकण्याची भीती पहिला डोस घेतलेल्यांमध्ये आहे. अशात आता कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यावरून 12 ते 16 आठवडे करण्यात आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमधील संभ्रम वाढत चालला आहे. लसीच्या टंचाईमुळे हे अंतर वाढवले जात असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. मात्र लसींचा तुटवडा असल्याने लसीकरणाच्या दुसऱ्या डोसचा कालावधी वाढवण्यात आला नसून, त्यामागे शाशास्त्रशुद्ध संशोध असल्याची प्रतिक्रिया इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे. कोविशिल्डचा दुसरा डोस हा पहिला डोस घेतल्यानंतर 82 ते 112 दिवसानंतरच घ्यावा, त्यामुळे ही लस आणखी परिणामकार होऊन शरीरात कोरोनाविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज 81.3 टक्क्यांपर्यंत तयार होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सुरुवातीला लसींच्या दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर
मागील दीड वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना संकटाशी लढत आहे. हे संकट कायमचे दूर करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावरील औषध आणि कोरोना प्रतिबंधित लस तयार करण्याच्या मागे लागले आहेत. त्यानुसार काही शास्त्रज्ञांना लस बनवण्यात यश आले. यात ब्रिटनच्या ऑक्सफर्डने विकसित केलेल्या कोविशिल्ड लसीचाही समावेश आहे. या लसीच्या चाचण्या यशस्वी झाल्याने या लसीच्या वापराला भारतात आपत्कालीन तत्वावर डिसेंबर 2020 मध्ये मान्यता देण्यात आली. भारतातील सिरम इन्स्टिट्यूट, पुणे हे देखील या लस उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यानुसार ऑक्सफर्डद्वारा विकसित आणि सिरमद्वारा उत्पादित कोविशिल्ड लस देण्यास 16 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. आजवर भारतात मोठ्या संख्येने नागरिकांनी कोविशिल्ड लस घेतली आहे. दरम्यान कोविशिल्डचे दोन डोस घ्यावे लागतात. ही लस घेण्यास सुरवात झाली तेव्हा शास्त्रज्ञांनी दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर असावे असे जाहीर केले होते. त्यानुसार 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जात होता.
एप्रिलमध्ये अंतर वाढवले
28 दिवसांनी दुसरा डोस घेणे गरजेचे असताना ब्रिटनमध्ये काही लाभार्थी दुसरा डोस घेण्यासाठी आले नाहीत. असे लाभार्थी उशिरा 42 ते 56 दिवसांदरम्यान आले. या दरम्यान दुसरा डोस घेतलेल्याच्या अँटीबॉडीज तपासल्या असता त्यात वाढ झाल्याचे दिसून आले. म्हणजेच 28 दिवसांनी दुसरा डोस घेण्यापेक्षा 42 दिवसांनंतर डोस घेतलेल्यांमध्ये जास्त अँटिबॉडीज दिसल्या. त्यामुळे दुसऱ्या डोसचे अंतर 42 ते 56 दिवस अर्थात 6 ते 8 आठवडे असे करण्यात आले. या नव्या बदलानुसार भारतात लसीकरण सुरू होते. तर दुसरीकडे लसीची टंचाई मोठ्या संख्येने निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये नाराजी आहे. दुसरा डोस घेण्यास विलंब होत असल्याने लसीचा पहिला डोस घेतलेले लाभार्थी चिंतेत होते. त्यामुळे राज्य सरकारकडून 18 ते 44 वयोगटातील लसीकरण स्थगित करून, 45 वर्षांवरील ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना दुसरा डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेतल्याबरोबर एक-दोन दिवसांतच NTAGI अर्थात नॅशनल टेक्निकल अँड अडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन या सरकारच्या पॅनलने 13 मे रोजी दुसऱ्या डोसमधील अंतर 82 ते 112 दिवस वाढवण्यात आल्याचे जाहीर केले. तर आता यानुसारच भारतात कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.
12 ते 16 आठवड्यानंतर लसीचा दुसरा डोस घेतल्यास अँटीबॉडीजमध्ये 81 टक्क्यांपर्यंत वाढ
एकीकडे कोविशिल्ड लसीचा प्रचंड तुटवडा असताना दुसरीकडे दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवण्यात आले आहे. दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्याने आणि हा बदल नियमित होत असल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. लसीच्या तुटवड्यामुळे हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. तसा प्रचार-प्रसार होत आहे. डॉ भोंडवे यांनी मात्र हा प्रचार-प्रसार चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसऱ्या डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे करण्याचा निर्णय हा NTAGI ने शास्त्रशुद्ध माहिती/संशोधनानुसार घेतला आहे. लँडसेटने केलेल्या अभ्यासातून 12 ते 16 आठवड्यानंतर दुसरा डोस घेतल्यास 81.3 टक्के अँटीबॉडीज तयार होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तेच या अभ्यासानुसार 42 ते 56 दिवसांत दुसरा डोस घेणाऱ्यामध्ये 55 टक्के अँटीबॉडीज तयार झाल्याचे दिसून आले आहे. तेव्हा 12 ते 16 आठवड्यानंतर दिसणारी ही परिणामकारकता पाहता NTAGI ने दुसऱ्या डोसमधील अंतर वाढवले आहे. त्यामुळे आता सर्व गैरसमज बाजूला ठेवत सर्वांनी 82 ते 112 दिवसादरम्यान (12 ते 16 आठवडे) ही लस घ्यावी असे आवाहन अविनाश भोंडवे यांनी केले आहे.
हेही वाचा - जळगावातील समृद्धी केमिकल फॅक्टरीत सेफ्टी टँकमध्ये बुडून तीन कामगारांचा मृत्यू