मुंबई - केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधातील धोरणाबाबत कडाडून टीका करत शरद पवार यांनी आज केंद्र सरकार झोपले आहे का? असा घणाघात केला आहे. यावेळी भाजपच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी असल्याचा पुनरुच्चार करत केंद्राने डाटा द्यावा अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये आज ओबीसी मोर्चाचे आयोजन केले होते यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. ओबीसी आरक्षणाचे मारेकरी केंद्र सरकारच असून केंद्राने आपल्याकडील पिंपरीकर डेटा दिला नाहीच शिवाय जातनिहाय जनगणनाही केली नाही, त्यामुळेच आरक्षणाचा पेच निर्माण झाल्याचे पवार यांनी म्हटले. आरक्षण प्रश्न कोणतीही कारवाई न करता केंद्र सरकार झोपले आहे का? असा संतप्त सवालही शरद पवार यांनी या परिषदेत केला आहे.
फडणवीस सरकारने काय दिवे लावले?- 2017 मध्ये विकास गवळी न्यायालयात गेल्यानंतर पिंपरीकर डाटा आणि ट्रिपल टेस्टचा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने एक अध्यादेश काढण्यापलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे हा प्रश्न तसाच अनुत्तरीत राहिला आणि चिघळला. फडणवीस सरकारने जर वेळीच काम केले असते तर ओबीसी आरक्षण गेले नसते असा आरोप छगन भुजबळ यांनी या परिषदेत बोलताना केला.
दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आरक्षण द्या नाहीतर मसणात जा असे वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर पलटवार करताना छगन भुजबळ म्हणाले की, असे बोलण्याचे धारिष्ट जर पाटील करीत असतील तर केंद्र सरकारने आधी मसणात जायला पाहिजे कारण त्यांच्यामुळेच हा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा - भाजपचा मोर्चा चिरडला; कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड