मुंबई - सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी मुंबईत आले असता त्यांना पालिकेने क्वारंटाईन केले आहे. त्याबाबत वाद झाल्यानंतर बिहार पोलिसांनी मुंबई पालिकेकडे मागणी केली असता, विनय तिवारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसे पत्रच पालिकेने बिहार पोलिसांना पाठवले आहे.
सिनेअभिनेता सुशांतसिंहच्या मृत्यूप्रकरणी बिहारमध्ये एफआयआर नोंद झाला आहे. त्याचा तपास करण्यासाठी बिहार पोलीस दलातील आयपीएस अधिकारी विनय तिवारी 2 ऑगस्टला विमानाने मुंबईत आले होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या गाईडलाईनप्रमाणे मुंबई महापालिकेने तिवारी यांना होम क्वारंटाईन केले आहे.
विनय तिवारी यांना क्वारंटाईमधून सूट हवी असल्यास सक्षम प्राधिकारी म्हणजेच महापालिका आयुक्तांकडे अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार बिहार पोलीस दलाचे इंस्पेक्स्टर जनरल संजय सिंग यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना क्वारंटाईनमधून सूट देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
यावर उत्तरादाखल पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी संजय सिंग यांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार बिहारमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे तिवारी यांच्या संपर्कात येऊन महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिवारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तपास करावा व या प्रकरणाची माहिती घ्यावी, अशा सूचना केल्या आहेत. यावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.