मुंबई - राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीवरून नाराज असलेले आयपीएस अधिकारी संजय पांडे मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत. लवकरच ते याचिका दाखल करणार आहेत.
काय आहे प्रकरण?-
परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली. यानंतर पोलिस महासंचालक असलेले हेमंत नगराळे यांना मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली. तर, रजनीश सेठ यांना नगराळेंच्या जागेवर पोलिस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले. यावरून आयपीएस संजय पांडे नाराज आहेत. त्यामुळे ते मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत. बुधवारपर्यंत ते मुंबई उच्च न्यायालयमध्ये याचिका दाखल करणार आहेत. याची माहिती स्वतः त्यांनीच दिली आहे.
हेही वाचा - परमबीर सिंग यांचे पत्र राजकीय दबावापोटी- बाळासाहेब थोरात
कोण आहेत संजय पांडे ? -
संजय पांडे 1986 च्या बॅचचे आयपीएस आहेत. ते महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाच्या शर्यतीत सर्वात मोठे दावेदार मानले जात होते. सेवाजेष्ठतेच्या निकषानुसार त्यांची वर्णी पोलीस महासंचालक पदावर लागावी, अशी त्यांची अपेक्षा होती.
संजय पांडे न्यायालयात का जाणार ?-
रजनीश शेठ हे संजय पांडेंचे ज्युनियर आहेत. तरीही रजनीश यांना पोलीस महासंचालकपदी नेमण्यात आले. यासंदर्भात पांडेंनी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली नाराजी कळवली. त्यानंतर पांडेंना देण्यात आलेल्या नव्या जबाबदारीचा कार्यभार न स्वीकारता त्यांनी मोठ्या सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात दाद मागणार आहेत.
हेही वाचा - अँटिलिया प्रकरण : एनआयएकडून हॉटेल ट्रायडेंटमध्ये तपासणी
परमबीर सिंग यांचे 100 कोटी खंडणीचे गृहमंत्र्यांवर आरोप -
दरम्यान, परमबीर सिंग यांना मुंबई पोलिस आयुक्त पदावरून हटवून गृहरक्षक दलाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले. यानंतर त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप लावले आहेत. महिन्याला मुंबईतील हुक्का पार्लर व बियर बारकडून 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश त्यांनी सचिन वाझेंना दिले होते, असे गंभीर आरोप त्यांनी देशमुखांवर केले आहेत. त्यानंतर मुंबई पोलीस खात्यामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या सध्याच्या चाललेल्या उघड बंडामुळे पोलीस खात्यात चर्चेला उधाण आले आहे. तर, सचिन वाझेंना राष्ट्रीय तपाय यंत्रणेने अटक केले आहे.