मुंबई - समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पोस्ट शेअर केल्यामुळे मारहाण करण्यात आली होती. मारहाण करणाऱया सहा जणांना अटक करून तात्काळ जामीन देण्यात आला. सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींना पोलीस जामीन देण्यात आलेला असून, त्यांच्यावर अधिक कारवाई करण्यासाठी आणखी कुठली कलमं लावता येतील का याचा अभ्यास करून पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुंबई पोलीस खात्याचे कायदा व सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.
दरम्यान, मारहाण करणारे हे सहाजण शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात पीडित नौदलाच्या माजी अधिकाऱ्याची भेट घेतली. आरोपींवर कारवाई करण्याऐवजी तात्काळ पोलीस जामीन झाल्याबद्दल त्या अधिकाऱयाने नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात पोलिसांनी आणखी काही कलम लावून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण -
मुंबईतील कांदिवली पूर्व येथे राहणाऱ्या मदन काशिनाथ शर्मा या 65 वर्षीय सेवानिवृत्त नौदल अधिकाऱयाने त्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सोनिया गांधी व शरद पवार यांच्या फोटोला नमस्कार करणारा उद्धव ठाकरे यांचा फोटो फॉरवर्ड केला होता. या प्रकरणी सदरच्या अधिकाऱयाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या प्रकरणातील पीडित मदन शर्मा यांना आठ ते दहा जणांनी मारहाण केल्यामुळे त्यांच्या डोळ्याला इजा झाली आहे.