मुंबई - तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह किनारपट्टीवर मोठं नुकसान झाले. मुंबईच्या किनारपट्टीवर राहणारे नागरिक आणि मत्स्य व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे या चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळावी ही अपेक्षा या मत्स्य व्यावसायिकांची आहे. जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज मुंबईतील ससून डॉक परिसरातील नुकसानग्रस्त झालेल्या बोटींची पाहणी केली.
हेही वाचा - सिप्ला 'या' औषधाची करणार विक्री; मृत्यूदर कमी होत असल्याचा दावा
तौक्ते चक्रीवादळामुळे या परिसरात राहणाऱ्या मत्स्य व्यावसायिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या भागात व्यवसाय असणारे लहान-मोठे मत्स्य व्यावसायिकांच्या बोटींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानांची पाहणी बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आली. चक्रीवादळात मच्छिमारांचे ५५ बोटी पुर्णतः फुटून नष्ट झाल्या असल्याची माहिती यावेळी मच्छिमारांकडून देण्यात आली. त्यामुळे मागील कर्ज माफ करून नव्याने कर्ज देऊन कर्जाचे व्याज किमान ५ वर्षासाठी माफ करावे. ज्या बोटींचे छोट्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांचा पंचनामा करून शासनाकडून त्वरित मदत निधी देण्यात यावा. जर नुकसान जास्तीचे असल्यास शासनाने बिन व्याजी कर्ज देऊन मच्छिमारांना आर्थिक संकटातून सुटका करावी. तसेच मासळी जाळी विननाऱ्या मच्छिमारांचेसुद्धा नुकसान झाले असून त्यांनासुद्धा आर्थिक आधार देण्यात यावा, अशा मागण्या मच्छिमारांकडून करण्यात आल्या आहेत.
येत्या दोन ते तीन दिवसात पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीवर राहणारे नागरिक, बागायतदार आणि मत्स्यव्यवसायिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या सर्वांना लवकरात लवकर मदत देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल, असे देखील विजय वडेट्टीवार यांनी संकेत दिले आहेत.
हेही वाचा - महाविकास आघाडी सरकारने सारथीची वाट लावली - चंद्रकांत पाटील