मुंबई - अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयू वॉर्डमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या वॉर्डमध्ये एकूण १७ रुग्णांवर उपचार सुरू होते. यातील १० जण दगावल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राज्यातील रुग्णालयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईमध्येही भांडुप ड्रीम्स मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला मार्च महिन्यात आग लागली होती. त्यानंतर मुंबईमधील रुग्णालये तसेच नर्सिंग होमची तपासणी करण्यात आली आहे. ज्यांनी अग्निसुरक्षेची नियम आणि यंत्रणांची पूर्तता केलेली नाही अशा रुग्णालये तसेच नर्सिंग होमविरोधात कोर्टात केसेस दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली. तसेच पालिका रुग्णालयात धूर शोधून बाहेर फेकणारी यंत्रणा बसवली जाणार आहे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
१५७४ रुग्णालय, नर्सिंग होमची तपासणी -
जानेवारी महिन्यात भंडारा येथे सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे या दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या आगीत सतरा बालकांपैकी सात बालकांना वाचविण्यात यश आले होते. ही घटना ताजी असतानाच मार्च महिन्यात मुंबईमधील भांडुप पश्चिमेला असलेल्या ड्रीम्स मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला आग लागली होती. या आगीमध्ये ११ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रुग्णालय आणि नर्सिग होमचे फायर ऑडिट करण्याची मागणी पुढे आली होती. या मागणीनुसार मुंबई अग्निशमन दलाने १५७४ रुग्णालय, नर्सिंग होमची पाहणी केली. त्यात अग्निसुरक्षा यंत्रणा बसवण्यात आली आहे का, ती यंत्रणा कार्यरत आहे का याची तपासणी करण्यात आली. ज्या रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा होती मात्र ती कार्यरत नव्हती त्यांना ती यंत्रणा सुरु करण्यास कालावधी देण्यात आला होता. त्यानंतरही ज्यांनी ही यंत्रणा कार्यरत केली नाही अशा रुग्णालय आणि नर्सिंग होम विरोधात महाराष्ट्र अग्निशमन नियमाच्या तरतुदीनुसार न्यायालयात केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.
त्यांच्यावर कारवाई
मुंबईत कोणतेही रुग्णालय, नर्सिग होम सुरु करण्यापूर्वी महापालिका तसेच मुंबई अग्निशमन दलाकडून अग्नी सुरक्षेच्या नियमांची पूर्तता करण्यात आली आहे का त्याची तपासणी केली जाते. तसेच दर सहा महिन्यांनी अग्नी सुरक्षा नियमांची आणि उपकरणांची पूर्तता करण्यात आल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. भंडारा येथेही रुग्णालयात तसेच त्यानंतर मुंबईत भांडुप येथील ड्रीम्स मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला आग लागली होती. या आगीच्या घटनेनंतर मुंबईमधील १५७४ हॉस्पिटल आणि नर्सिंग होमची अग्निशमन दलाने तपासणी केली आहे. या तपासणीनंतर ज्यांनी अग्निसुरक्षेचे पालन केले नाही त्यांच्याकडून त्यांची पूर्तता करून घेण्यात आली आहे. ज्यांनी याची पूर्तता केली नाही त्यांच्यावर नियमानुसार कोर्टात केसेस दाखल करण्यात आल्या असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाचे उप मुख्य अग्निशमनदल अधिकारी डॉ. राजेंद्र चौधरी यांनी दिली. नगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना दुर्दैवी असून सदर घटनेच्या उच्चस्तरीय सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना तात्काळ देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
धूर शोधून बाहेर फेकणारी यंत्रणा -
पालिकेच्या प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयात देशाच्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे रुग्णालय व परिसरात रुग्णांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. आगीची घटना घडल्यास रुग्णांसह नातेवाईक, डॉक्टर-कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. या ठिकाणी आग लागल्यास रुग्ण व कर्मचाऱ्यांना बाहेर काढणे कठीण बनते. आगीचा धूर पसरल्यास तात्काळ रुग्णांना बाहेर काढणे कठीण जाते. केवळ धुरात गुदमरल्याने जीवितहानी वाढण्याचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील सुरक्षेच्यादृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत. १६ उपनगरीय रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग, अतिदक्षता विभाग अशा महत्त्वाच्या ठिकाणी आग लागलेल्या ठिकाणचा धूर शोधून बाहेर फेकणारी यंत्रणा बसवली जाणार आहे. पालिका यासाठी २ कोटी ४२ लाख ३५ हजार ७८८ रुपये खर्च करणार आहे. रुग्णालयात बसविण्यात येणाऱ्या यंत्रणेमुळे धूर बाहेर फेकल्याने 'व्हिजिबिलिटी' वाढल्याने बचावकार्यात मदत होईल, असे प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी सांगितले.
गेल्यावर्षी ३८४१ आगीच्या घटना, १०० जणांचा मृत्यू -
मुंबईमध्ये जागोजागी उंच इमारती बांधल्या जातात. अशा उंच इमारती बांधताना त्यामध्ये सुरक्षा आणि आगीपासून वाचण्यासाठी यंत्रणा कार्यरत नसतात. यामुळे सामान्य नागरिकांचा जीव जातो. गेल्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये एकूण ३८४१ आगीच्या घटना नोंद झाल्या. त्यात १०० जणांचा मृत्यू झाला असून २९८ लोक जखमी झाले आहेत. अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिल्याचे आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी सांगितले. महाराष्ट्र अग्नी प्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनियम - २००६ च्या अंमलबजावणी का करत नाही ? असा प्रश्न शेख यांनी उपस्थित केला आहे.
दहा वर्षात ४८ हजार ४३४ आगीच्या घटना -
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे आगीबाबतची आकडेवारी मागवली होती. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीमधून ही आकडेवारी समोर आल्याचे शेख यांनी सांगितले. अग्निशमन दलाकडून याआधी २००८ ते २०१८ या दहा वर्षात किती आगीच्या घटना घडल्या याचीही माहिती मागवली होती. या दहा वर्षाच्या काळात गेल्या २००८ ते २०१८ या दहा वर्षाच्या कालावधीत ४८ हजार ४३४ आगी लागण्याच्या घटना नोंद झाल्या आहेत. त्यात १५६८ गगनचुंबी इमारतीचा समवेश आहे. तसेच ८७३७ रहिवाशी इमारतीत आग लागली आहे. तसेच ३८३३ व्यासायिक इमारतीत आग लागली आहे. ३१५१ झोपडपट्टयांमध्ये आग लागली आहे.
सर्वाधिक आगी शॉक सर्किटमुळे -
गेल्या दहा वर्षात ज्या आगीच्या घटना घडल्या आहेत त्यामध्ये सर्वाधिक आगी या शॉक सर्किटमुळे लागल्या आहेत. या काळात ३२ हजार ५१६ आगी या शॉक सर्किटमुळे लागल्या आहेत. १११६ आगी या गॅस सिलेंडर लिकेजमुळे लागल्या आहेत. तर ११ हजार ८८९ आग या अन्य कारणामुळे लागल्या आहेत. दहा वर्षाच्या कालावधीत एकूण ६०९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात २१२ पुरुष व २१२ महिलांचा तसेच २९ मुलांचा समावेश आहे. आगीच्या घटनेत ८९ कोटी ४ लाख ८६ हजार १०२ रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
रुग्णालयांच्या आगीत ६१ जणांचा मृत्यू -
ऑक्टोबर २०२० - जनरेटवर जास्तप्रमाणात तापल्याने मुलुंडच्या एपेक्स कोव्हिड रुग्णालयाला आग लागली. या आगीत 1 रुग्ण मृत्युमुखी पडला.
जानेवारी २०२१ - रेडियंट वॉर्मल कंट्रोल पॅनलमध्ये स्पार्क झाल्याने भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु विभागात आग लागली. यात १० नवजात बालकांचा मृत्यू झाला.
२६ मार्च २०२१ - भांडुपच्या सनराईज कोव्हिड रुग्णालयाला आग लागून ११ कोव्हिड रुग्णांचा मृत्यू झाला. ही आग शॉर्टसर्कीटने लागल्याचे समजते.
१० एप्रिल २०२१ - नागपुरच्या वाडी परिसरातील कोव्हिड रुग्णालयात आयसीयूला आग लागली. या आगीत ४ रुग्णांचा मृत्यू झाला.
२१ एप्रिल २१ - नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे ऑक्सिजनअभावी २२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १२ पुरुष आणि १० महिला रुग्ण होते.
२३ एप्रिल २०२१ - विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयात एसी युनिटला आग लागल्याने १३ रुग्णांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - नगरच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयू वॉर्डला आग; 11जण दगावले!