मुंबई - तुम्ही आतापर्यंत अनेक महिलांच्या जीवन कथा ऐकल्या असतील अथवा किंवा वाचल्या असतील. पण, आज आपण अशा एका समाजिवेकेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या पूर्वी पत्रकार होत्या. आता त्या सहा हजार महिलांच्या आधार झाल्या आहे. या समाजसेविकेचे नाव आहे त्रिवेणी आचार्य (Social Worker Triveni Acharya ).
त्रिवेणी आचार्य यांच्याशी 'ईटिव्ही भारत'ने संवाद साधला आहे. पत्रकारिता सोडून तुम्ही पुर्णवेळ समाजसेविका झाला, याबाबत विचारले असता त्रिवेणी आचार्य म्हणाल्या की, "मी पत्रकार असताना एक मोठा अभिनेता वेश्यावस्तीत जाऊन आपला वाढदिवस साजरा करणार होता. त्याच्या रिपोर्टींगसाठी मी या वस्तीत गेले होते. त्यावेळी तिथली एकूण परिस्थिती बघितली व तेव्हाच ठरवले आपल्याला या महिलांसाठी काहीतरी करायचे आहे. इथे अनेक लहान लहान मुली होत्या. काही जणांना जबरदस्तीने व्यवसायात आणले गेले होते. मला या सर्वांना त्यातून बाहेर काढायचे होते. म्हणून मी पत्रकारिता सोडली आणि पूर्णवेळ समाजसेविका झाले."
पहिले रेस्क्यू ऑपरेशन
पहिल्या रेस्क्यू ऑपरेशनची आठवण सांगताना त्रिवेणी आचार्य यांनी म्हटलं, " माझ्या नवऱ्याच्या दुकानात कामाला एक मुलगा होता. त्याची प्रेयसी कोठ्यावर होती. त्याला तिला त्याच्यातून सोडवून तिच्याशी लग्न करायचे होते. तिला सोडविण्यासाठी आम्ही कामाठीपुराच्या भागात गेलो होतो. या रेस्क्यू मध्ये आम्ही एकच नाही तर तब्बल 15 तरूणींची सुटका केली होती."
15 ते 6 हजार
"1993 ला पहिले रेस्क्यू केले होते 1993 साली. ते आत्तापर्यंत आम्ही जवळपास सहा हजार महिलांची, मुलींची, लहान बालकांची या दलदलीतून सुटका केलेली आहे," असेही त्रिवेणी आचार्य यांनी म्हटलं आहे.
समाजाचा त्रास
"पूर्वी मुंबई आणि दिल्ली पर्यंतच मर्यादित असलेला हा व्यवसाय आता प्रत्येक जिल्ह्याजिल्ह्यात पोहोचला आहे. असे असले तरी जिथे चांगले काम होत असते ठेवत असतात. जिथे जिथे आमच्या संस्थेची शेल्टर होम आहेत, त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांची मानसिकता काही ठीक नाही. बाहेरची घाण आमच्या इथे आणून ठेवली आहे, असे त्यांचे बोलणे असते. हे कुठेतरी बदलले पाहिजे," अशी भावनाही त्रिवेणी आचार्य यांनी व्यक्त केली.
"या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्या देखील माणूस आहेत त्यांनादेखील सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. त्या जन्माला आल्या तेव्हा एक मुलगी, एक सामान्य स्त्रीच होत्या. तुम्ही त्यांना कोठ्यावर बसवलत आता समाजात उच्च स्थानावर बसवण्याची जबाबदारी देखील तुमचीच आहे," असे त्रिवेणी आचार्य सांगतात.