मुंबई - देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोलचे दर शंभरी पार झाले आहेत. यावर भाष्य करताना संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. महागाई सारख्या राक्षसाला आपण (२०२४)ला जाळायचे आहे. त्याची सुरुवात उद्याच्या रावण दहनापासून करु, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
त्या नाटक चळवळीला चांगलं उत्तर दिलं जाईल
दसऱ्या मेळाव्याला शिवसेना पक्ष प्रमुखांची तोफ धडाडते. उद्या ती तोफ धडाडणार आहे. महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत, महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी दोन वर्ष काही कामधंदा उरला नसल्याने जी नाटक चळवळ सुरु केली आहे, त्या नाटक चळवळीला चांगलं उत्तर दिलं जाईल, असा इशारा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.
नियम आणि कायदा यांचं भान ठेवून हा मेळावा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा हा षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. यावरुन देखील शिवसेनेवर टीका करण्यात आली. कोरोनाच्या काळात सभा घेण्यासा परवानगी नसताना शिवसेनेला परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल केला जात आहे. यावर देखील राऊत यांनी उत्तर दिलं आहे. संपूर्ण नियम आणि कायदा याचे भान ठेवून हा मेळावा होईल. त्यावर कोणी जरी टीका करत असले, तरी त्या टीकेला अर्थ नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. पुढे बोलताना त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते उद्या देशाच्या, महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी, राज्याच्या विकासाविषयी अशा अनेक प्रश्नांवर भाष्य करतील, असे राऊत यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - ठाकरी तोफ धडाडणार; शिवसेनेचा दसरा मेळावा शुक्रवारी सायंकाळी पार पडेल