मुंबई - आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपण पाहतो. हल्ली महिला विविध क्षेत्रात उच्च पदावर काम करताना आपण बघतोय. मात्र, भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्य कारखाना व्यवस्थापक म्हणून पहिली महिला लाभली आहे. त्या होय मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपच्या मुख्य कारखाना व्यवस्थापक अंजली सिन्हा. आज 35 हेक्टरमध्ये पसरलेल्या रेल्वे कारखान्यामधील नऊ हजार पेक्षा जास्त कर्मचार्यांचे नेतृत्व त्या महिला म्हणून यशस्वीरित्या करत आहे. याबाबतचा ईटीव्ही भारताचा हा विशेष रिपोर्ट.
हेही वाचा - Nitesh Rane On Raid : राहुल कनाल नाईट लाईफ गॅंगचा सदस्य - नितेश राणे
इतिहासात पहिल्यांदाच नेतृत्व -
भारतावर इंग्रजांचे राज्य असताना आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी 14 एप्रिल 1853 ला बोरीबंदर ते ठाणे या स्थानकादरम्यान धावली. तेव्हापासून संपूर्ण भारतात रेल्वेचे जाळे पसरू लागले. तेव्हा हळूहळू रेल्वे गाड्यांची देखभाल दुरुस्तीसाठी रेल्वे कारखाने उभारण्याची सुरुवात झाली. मुंबईत 1915 साली ब्रॉडगेज आणि नॅरोगेज रेल्वे गाड्यांच्या दुरुस्तीसाठी माटुंगा कारखाना उभारण्यात आला. शंभर वर्षांपेक्षा जास्त वर्ष झालेल्या माटुंगा रेल्वे कारखान्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. 35 हेक्टरमध्ये पसरलेल्या रेल्वे कारखान्यामध्ये 9 हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. ज्यामध्ये 482 महिला कर्मचारी आहेत. शंभर वर्षांच्या इतिहासात पाहिल्यांदाच रेल्वे कारखान्याचे नेतृत्व अंजली सिंह महिला म्हणून यशस्वीरित्या करत आहे.
अभिमान वाटतोय...
माटुंगा कारखान्याच्या मुख्य व्यवस्थापक अंजली सिन्हा यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, साडेतीन वर्षांपूर्वी मी जेव्हा कारखान्याची सूत्र हाती घेतली तेव्हा कारखान्यामधील पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. आज माटुंगा कारखान्यात मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आहे. या कारखान्यांमध्ये अगदी अवजड सामान उचलण्यापासून तर सर्व प्रकारची कामे पुरुषांबरोबर महिलासुद्धा करत आहेत. माटुंगा कारखान्यात 450 पेक्षा अधिक महिला कर्मचारी काम करत आहेत. ज्यामध्ये 300 महिला कर्मचारी टेक्निकल फिल्डमधील आहेत. वेल्डिंग, मशीनिंग, पेंटिंग, विद्युत यंत्रांची दुरुस्ती, ट्रावसर मशीन चालविण्यासारखे काम आज कारखान्यात महिला करत आहेत. त्यांच्याबरोबर, काम करत असताना एक वेगळा आनंद मिळत आहे. आम्ही एक कुटुंब म्हणून रेल्वे कारखान्याला उंचीवर घेऊन जाण्यासाठी काम करत आहे.
सक्षम बनवण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न -
अंजली सिन्हा यांनी महिला दिनानिमित्त सांगितले की, ज्या काळात महिलांवर अनेक बंदी घातली जात होती. साधारण घरातून बाहेर पडण्यासाठी देखील पुरुषाची परवानगी घ्यावी लागायची, त्या काळात अनेक महिलांनी समाज व्यवस्थेच्या चौकटीबाहेर पडून आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष केला आहे. उत्तमरित्या सरकारी खात्यात नोकरी करून आपल्या संसाराचा गाडा हाकलत आहेत. त्यांच्या धाडसामुळे आज महिला पुरुष समानता आलेली आहे. आज देशाच्या प्रत्येक आघाडीवर महिला काम करत आहेत. भारतीय रेल्वेत सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला काम करत आहेत. रेल्वेकडून त्यांना कौशल्य विकासाचे धडे शिकवले जात आहेत. महिलांना सक्षम बनवण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत.
हेही वाचा - High Court directions : सीसीटीव्ही प्रकरणी सरकारला फटकारले, कंत्राटदारला उपस्थित राहण्याचे निर्देश